फ्लॅटच्या नावाने निवृत्त पोलीस अधिकार्याला घातला गंडा
चार ठगाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 सप्टेंबर 2025
मुंबई, – निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांतून स्वतच्या घराचे स्वप्न पाहणार्या एका निवृत्त पोलीस अधिकार्याला चार ठगांनी फ्लॅटच्या नावाने गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार लालबाग परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या पोलीस अधिकार्याच्या तक्रारीवरुन चारही ठगाविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. प्रविण सखाराम रोगे, संतोष धोंडू चव्हाण, दिपेश दिलीप पंदीरकर आणि अभिषेक राजू साळुंखे अशी या चौघांची नावे आहेत. या गुन्ह्यांत चौघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
60 वर्षाचे विजय कृष्णकांत देशमुख हे लालबाग परिसरात राहतात. ऑक्टोंबर 2022 रोजी ते डोंगरी पोलीस ठाण्यातून निवृत्त झाले आहेत. पोलीस सेवेत असताना ते पोलीस वसाहतीत राहत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांना तीस ते पत्तीस लाख रुपये मिळाले होते. याच पैशांतून त्यांनी स्वतसाठी एक घर घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. ऑगस्ट 2023 रोजी त्यांची प्रविण रोगेश ओळख झाली होती. त्याने तो रेल्वेमध्ये कामाला असल्याचे सांगून त्याच्यासह संतोष चव्हाण, दिपेश पंदीरकर हे तिघेही प्रॉपटी डिलर आहेत. ते तिघेही अनेकांना स्वस्तात घर, दुकान विक्रीचे काम करतात. त्यांनाही त्यांच्या बजेटमध्ये एक घर देण्याचे आश्वासन दिले होते.
याच दरम्यान त्याने त्यांना ना. म जोशी, लालबाग आणि भोईवाडा परिसरात काही घर दाखविले होते. त्यापैकी लोअर परेल येथील हनुमान गल्ली, श्रीनिवास मिल टॉवरमधील फ्लॅट 1130 आणि 1131 या दोन बंद अवस्थेत असलेल्या घरांचा सामवेश होता. त्यांनी त्यांना तेच घर स्वस्तात देतो असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी 1131 क्रमांकाचे घर विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. तो फ्लॅट त्यांचा खास मित्र अभिषेक राजू साळुंखे याच्या मालकीचा असून त्याला त्याचे घर विक्री करायचे आहे असे सांगितले. सध्या तो बाहेरगावी असून तो मुंबईत आल्यानंतर घराचा व्यवहार करु असे सांगितले होते. चर्चेअंती त्यांच्या घराची किंमत 43 लाखांमध्ये फिक्स झाली होती.
याच फ्लॅटसाठी त्यांनी प्रविणसह इतर दोघांनाही साडेसतरा लाख रुपये दिले होते. यावेळी त्यांनी त्यांना डिसेंबर 2023 पर्यंत घराचा ताबा देण्याचे तसेच उर्वरित पेमेंटचा व्यवहार करण्याचे सांगितले होते. त्यापूर्वी त्यांनी त्यांना घराचे झेरॉक्स प्रत दाखविले होते, मात्र घराचे कागदपत्रे दिले नव्हते. काही दिवसांनी त्यांनी त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्यांचे कॉल घेतले नाही. कॉल घेतल्यानंतर ते तिघेही अभिषेक अद्याप मुंबईत आला नाही असे सांगत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी श्रीनिवास मिल टॉवरमधील संबंधित फ्लॅटची चौकशी सुरु केली होती. यावेळी त्यांना 1131 क्रमांकाचा फ्लॅट अभिषेक साळुंखे याच्या मालकीचा नसल्याचे तसेच तो फ्लॅट दुसर्या मिल कामगाराच्या नावावर असल्याचे समजले होते.
या माहितीने त्यांना धक्काच बसला होता. हा प्रकार प्रविण रोगेसह दोघांना सांगून त्यांनी फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. पैसे दिले नाहीतर त्यांच्यावर केस करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांनी त्यांना आठ लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित साडेनऊ लाखांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यामुळे विजय देशमुख यांनी घडलेला प्रकार काळाचौकी पोलिसांना सांगून संबंधित चौघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर प्रविण रोगे, संतोष चव्हाण, दिपेश पंदीकर आणि अभिषेक साळुंखे यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.