बदलीमुळे आलेल्या नैराश्यातून पोलीस अधिकार्याची आत्महत्या
निवासी इमारतीच्या टेरेसवर गळफास घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – बदलीमुळे आलेल्या मानसिक नैराश्यातून एका पोलीस अधिकार्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांताक्रुज येथे उघडकीस आली आहे. प्रल्हाद मधुकर बनसोडे असे या ४२ वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असून त्यांनी आपल्या राहत्या इमारतीच्या टेरेसवर गळफास घेऊन जीवन संपविले. त्यांच्या आत्महत्येने पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता सांताक्रुज येथील वाकोला, नवीन पोलीस अधिकारी वसाहतीमध्ये घडली. याच वसाहतीच्या इमारत क्रमांक ७५, रुम क्रमांक ४०६ मध्ये प्रल्हाद बनसोडे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते. ते सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली होती. या बदलीवरुन ते मानसिक तणावात होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी मंगळवारी सायंकाळी त्यांच्या इमारतीच्या टेरेसवर गेले होते. काही वेळानंतर त्यांनी तिथेच गळफास घेऊन आत्महत्या केली. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच वाकोला पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना प्रल्हाद यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तातडीने जवळच्या व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या आत्महत्येमागील अधिकृत कारण समजू शकले नाही. मात्र बदलीमुळे आलेल्या मानसिक नैराश्यातून त्यांनी त्यांच्या इमारतीच्या टेरेसवर गळफास लावून जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. त्यांच्या नातेवाईकांची लवकरच जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून त्यांच्या आत्महत्येमागील अधिकृत कारण समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान प्रल्हाद बनसोडे यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच त्यांच्या सहकारी पोलिसांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. प्रल्हाद यांच्या आत्महत्येमागे बदली हे कारण होते की अन्य कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली याचा पोलीस तपास करत आहेत.