मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ जानेवारी २०२५
मुंबई, – फ्लॅटमध्ये रंगकाम करताना लाकडी कपाटातून हिरेजडीत दागिन्यासह कॅश चोरी करणार्या एका पेंटरला खार पोलिसांनी अटक केली. समीर सलीम अन्सारी असे या ३७ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे हिरेजडीत कानातील टॉप, २६ हजाराची कॅश, ५०० युएस डॉलर असा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. सलीमचे वडिल आजारी असून त्यांच्या उपचारासह मित्रांना पार्टी देण्यासाठी त्याने ही चोरी केल्याचे बोलले जाते.
संदेश मणिलाल चौधरी हे भाईंदर येथे राहत असून सिनेअभिनेत्री पूनम ढिल्लोन यांच्याकडे मॅनेजर म्हणून कामाला आहे. पूनम या जुहू परिसरात तर तिचा मुलगा अनमोल अशोक ठकेरिया हा वांद्रे येथील पाली हिल, पाली माला अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक ३०१ व ३०२ मध्ये राहतो. २८ डिसेंबरला या फ्लॅटमध्ये पेंटींगचे काम सुरु होते. त्यासाठी तीन कामगार काम करत होते. त्यामुळे अनमोल हा दुबईला गेला होता. या कामाची देखरेख संदेश चौधरी हे स्वत पाहत होते. ५ जानेवारीला अनमोल दुबईहून मुंबईत परत आला होता. यावेळी त्याला त्याच्या लाकडी कपाटातून काही कॅश, युएस डॉलर आणि हिरेजडीत कानातील टॉप चोरीस गेल्याचे दिसून आले. हा प्रकार त्याने त्याची आई पूनम ढिल्लोन हिला सांगितला. यावेळी तिने तिला याबाबत काहीच माहिती नसल्याने सांगितले.
घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच अनमोलच्या वतीने संदेश चौधरी यांनी खार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी फ्लॅटमध्ये रंगकाम करणार्या तीन कामगारांवर संशय व्यक्त केला होता. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास केला होता. चोरीचा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक वैभव काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता कोकणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज वैद्य, पोलीस हवालदार निकम, पोलीस शिपाई मयुर जाधव, मारुती गळवे, कदम यांनी रंगकाम करण्यासाठी फ्लॅटमध्ये आलेल्या तिन्ही कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
या चौकशीदरम्यान समीर अन्सारी हा विसंगत माहिती देत असल्याचे उघडकीस आले. त्याचा या गुन्ह्यांत सहभाग असल्याचा संशय येताच त्याची पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली होती. या चौकशीत त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी हिरेजडीत टॉप, २६ हजाराची कॅश आणि पाचशे युएस डॉलर पोलिसांनी जप्त केले. चोरीच्या याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले. सलीमची आर्थिक परिस्थिती बेताची असून त्याचे वडिल आजारी असल्याने त्याला उपचारासाठी पैशांची गरज होती. तसेच त्याने त्याच्या मित्रांना पार्टी देण्याचे आशवासन दिले होते. त्यामुळे रंगाकाम करताना त्याने ही चोरी केली होती. चोरीनंतर तो हिरेजडीत टॉप विकण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वीच त्याला चोरीच्या मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली.