पॉर्न व्हिडीओ दाखवून दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नागपाड्यातील घटना; २५ वर्षांच्या सुरक्षारक्षकाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ जुलै २०२४
मुंबई, – पॉर्न व्हिडीओ दाखवून एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा सुरक्षारक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार नागपाडा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच मोहम्मद गणी बशीर खान ऊर्फ शहजाद नावाच्या एका २५ वर्षांच्या सुरक्षारक्षकाला नागपाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून त्यात काही पॉर्न व्हिडीओ असल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
३९ वर्षांचे तक्रारदार नागपाडा परिसरात राहतात. त्यांना दहा वर्षांची एक मुलगी आहे. शनिवारी रात्री दहा वाजता जेवण करुन त्यांची मुलगी मेडीकलमधून चीज आणण्यासाठी गेली होती. चीज घेऊन घरी येताना जिन्यावर तिला सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्या मोहम्मद गणीने थांबवून त्याच्या मोबाईलवर तिला पॉर्न व्हिडीओ दाखवून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि ती धावत घरी निघून गेली. घडलेला प्रकार तिने तिच्या वडिलांना सांगितला. तिच्याकडून ही माहिती समजताच त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात मोहम्मद गणीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ७४, ७८ भारतीय न्याय संहिता सहकलम १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर मोहम्मद गणी हा पळून गेला होता. त्यामुळे सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन काही तासांत मोहम्मद गणीला पोलिसांनी नागपाडा येथून अटक केली. मोहम्मद गणी हा नागपाडा येथील मदनपुरा, जैनाब टॉवर अपार्टमेंटमध्ये राहत असून सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.