मोस्ट वॉण्टेड गॅगस्टर प्रसाद पुजारीला मोक्का कायद्यांतर्गत अटक व कोठडी
विक्रोळीतील शिवसेनेच्या व्यावसायिक पदाधिकार्यावर गोळीबारप्रकरण
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ मार्च २०२४
मुंबई, – पाच वर्षांपूर्वी विक्रोळी येथे शिवसेनेचे व्यावसायिक पदाधिकारी चंद्रकांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणात मोक्का कायद्यांतर्गत वॉण्टेड असलेल्या गॅगस्ट प्रसाद ऊर्फ सुभाष विठ्ठल पुजारी ऊर्फ सिद्धार्थ शेट्टी ऊर्फ सिद्धू ऊर्फ जॉनी याला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्यांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याने अटकेनंतर त्याला विशेष मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रसाद पुजारीविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात आठहून अधिक गुन्ह्यांची नोंद असून यातील पाच गुन्ह्यांचा तपास खंडणीविरोधी पथक तर तीन गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट सातकडे आहे. त्यामुळे या सर्व गुन्ह्यांत ताबा घेऊन त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. मुंबईतून पळून गेल्यानंतर आतापर्यंतच्या त्याच्या प्रवासाची माहिती काढून याकामी त्याला कोणी मदत केली होती का याबाबत चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.
कुमार पिल्ले आणि नंतर छोटा राजन टोळीसाठी काम करु लागला. कुमार पिल्लेनंतर छोटा राजनसोबत मतभेद झाल्यानंतर त्याने स्वतची टोळी बनविली होती. गेल्या वीस वर्षांपासून तो विदेशात वास्तव्यास होता. विदेशात राहून तो त्याच्या कारवाया करत होता. याच दरम्यान त्याने त्याच्या सहकार्याच्या मदतीने मुंबई, ठाणे, नवी मुंबईत टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. डिसेंबर २०१९ रोजी विक्रोळीतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि व्यावसायिक चंद्रकांत जाधव यांच्यावर प्रसाद पुजारीने गोळीबार घडवून आणला होता. या गोळीबारानंतर काही शूटरला पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत या गोळीबारामागे प्रसाद पुजारीचे नाव समोर आले होते. त्यानेच गुन्हेगारी जगतात स्वतच्या टोळीचा दबदवा निर्माण करण्यासाठी हा गोळीबार घडून आणला होता. त्यानंतर त्याने अनेक प्रतिष्ठित निर्माता-दिग्दर्शक, कलाकारांकडे खंडणीची मागणी करुन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त होताच मुंबई पोलिसांनी प्रसादसह त्याच्या टोळीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याच्या बहुतांश सहकार्यांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती. यातील काही गुन्ह्यांत त्याच्या सहकार्यांना शिक्षा झाली आहे तर काही प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ आहेत. या बहुतांश गुन्ह्यांत प्रसादला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. २००४ साली त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. काही महिने जेलमध्ये राहिल्यानंतर २००५ साली त्याची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर तो मुंबई सोडून विदेशात पळून गेला होता.
विदेशात गेल्यानंतर त्याच्या गुन्हेगार कारवायांचा आलेख चढताच राहिला होता. २०२३ पर्यंत प्रसादविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी उकाळणे, जिवे मारण्याची धमकी देणे, अवैध शस्त्रे बाळगणे आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) कलमांतर्गत आठ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्याचा शोध सुरु असताना तो चीन आणि हॉंगकॉंग येथे असल्याचे काही पुरावे पोलिसांना सापडले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केले होते. याच दरम्यान तो चीनच्या बिजिंग शहरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी भारतीय तपास यंत्रणेसह इंटरपोलच्या मदतीने प्रसाद पुजारीला अटक केली. अटकेनंतर त्याला भारतात आणण्यात आले होते. शुक्रवारी रात्री त्याला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणल्यानंतर विक्रोळीतील गोळीबाराच्या मोक्का कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली. याच गुन्ह्यांत त्याला शनिवारी विशेष सत्र न्यायालयात पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रसाद पुजारी हा मूळचा कर्नाटकचा रहिवाश आहे. २००५ सालापर्यंत तो विक्रोळीसह नवी मुंबईत वास्तव्यास होता. या काळात पूर्व उपनगरात कुमार पिल्ले टोळीची प्रचंड दहशत होती. त्यामुळे तो कुमार पिल्लेसोबत काम करुन गुन्हेगारी जगतात सक्रिय झाला होता. कालातंराने त्याचे कुमार पिल्लेसोबत बिनसले आणि तो छोटा राजन टोळीत सामिल झाला होता. पुढे त्याने स्वतची टोळी तयार केली होती. टोळीचा दबदबा निर्माण करण्यासाठी त्याने मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील अनेक राजकीय नेते, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांना खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर नंतर त्याने बॉलीवूडला टार्गेट केले होते. अनेकदा तो स्वत खंडणीसाठी धमकी देत होता. प्रसाद पुजारीकडून आलेल्या धमकीमुळे काही व्यापार्यासह व्यावसायिकाने त्याला प्रोटेक्शन मनीच्या नावाने खंडणीची रक्कम दिली होती. त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या आठपैकी पाच गुन्ह्यांचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे तर तीन गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या सातकडे आहेत. त्यामुळे खंडणीविरोधी पथकाकडून पाचही गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे. या आठपैकी चार गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध मोक्का लावण्यात आल्याचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हॉंगकॉंगनंतर तो चीनमध्ये काही वर्षांपासून वास्तव्यास होता. तिथेच त्याने एका चीनी महिलेशी प्रेमसंबंध झाले होते. त्यानंतर या दोघांनी लग्न केले होते. स्वतची ओळख लपविण्यासाठी त्याने स्वतचा मोबाईल ऍक्सेसरीचा व्यवसाय सुरु केला होता. व्यावसायिक भासवून त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरु होते. त्याच्याविरुद्ध एप्रिल २०२३ रोजी शेवटच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. चीनमधून प्रत्यार्पण झालेला प्रसाद पुजारी हा पहिलाच गॅगस्टर असून तो चीनमध्ये व्यावसायिक असल्याचे भासवून तपास यंत्रणेची दिशाभूल करुन वास्तव्य करुन राहत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त अमोघ गावकर, दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, सुनिल पवार, पोलीस हवालदार महेश धादवड, मोहन सुर्वे, इंटरपोल समन्वय कार्यालयाचे पोलीस निरीक्षक महेश पारकर, गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक, गुन्हे शाखा युनिट सातच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली.