बिल्डरला धमकी दिल्याप्रकरणी प्रसाद पुजारीला अटक
प्रत्यार्पणानंतर वेगवेगळ्या गुन्ह्यांत अटकेची मालिका सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 मार्च 2025
मुंबई, – आईच्या जामिनासाठी विक्रोळीतील एका बिल्डरला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन प्रसाद विठ्ठल पुजारी ऊर्फ सुभाष विठ्ठल पुजारी ऊर्फ पच्चू ऊर्फ सिद्धू ऊर्फ जॉनी याला गुरुवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यांत विदेशातून प्रत्यार्पण केल्यानंतर प्रसाद पुजारीची वेगवेगळ्या गुन्ह्यांत अटकेची मालिका सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
60 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार बिल्डर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत विक्रोळी परिसरात राहतात. विक्रोळी परिसरातच ते एका राजकीय पक्षाचे उपविभागप्रमुख म्हणून काम करतात. 19 डिसेंबर 2019 रोजी त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. त्यात ते जखमी झाले होते. हा गोळीबार प्रसाद पुजारीच्या आदेशावरुन त्याच्या सहकार्यांनी केला होता. या गोळीबारानंतर विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग केला होता. याच गुन्ह्यांत दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यात कृष्णधर शिवनाथ सिंग ऊर्फ के. डी सिंग ऊर्फ शिवम, आनंद नरहरी फडतरे, उमेश चंद्रशेखर शेट्टी, सागर मनोज मिश्रा ऊर्फ अभय विक्रम सिंग, विजय गोविंद वाघमारे, लक्ष्मण रामा पवार ऊर्फ महाकाल, पप्पू राजबली दुबे, सागर रावसाहेब जाधव, इंदिरा विठ्ठल पुजारी आणि सुकेशकुमार सुवर्णा यांचा समावेश होता. या गोळीबारानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते.
17 एप्रिल 2023 रोजी ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन प्रसाद पुजारीने कॉल करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी त्याने त्याचा खटला सुरु झाला का, त्याच्या आईला जामिन मिळाला का याबाबत विचारणा केली होती. त्याच्या आईला जामिन झाल्याची माहिती असल्याने त्यांनी त्याला होकार दिला होता. त्यानंतर त्याने त्यांना पुन्हा कॉल करुन त्याच्या आईला जामिनासाठी एनओसी देण्याबाबत तसेच त्यांनी तसे न केल्यास त्यांच्यासह इतर साक्षीदारांना सोडणार नसल्याची धमकी दिली होती. आईच्या जामिनासाठी प्रसाद पुजारीकडून सलग दोन वेळा जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने त्यांनी विक्रोळी पोलिसांत प्रसाद पुजारीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांचा तपासही नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यात त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. अखेर त्याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. प्रसाद हा आंतरराष्ट्रीय गँगस्टर असून त्याने विदेशात राहून मुंबई शहरात स्वतच्या टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणीसाठी धमकी देणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असून यातील बहुतांश गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मार्च 2024 रोजी त्याचे विदेशातून प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्यानंतर त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यांत अटक करुन त्याची चौकशी सुरु आहे.