शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू
पुण्यातील घटना; स्थानिक रहिवाशांमध्ये शोककळा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ मे २०२४
पुणे, – शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या सात ते चौदा वयोगटातील चार अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी पुण्यातील निरगुडसर परिसरात घडली. मृतांमध्ये तीन मुलीसह एका मुलाचा समावेश असून या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. श्रद्धा काळू नवले (१३), सायली काळू नवले (११), दिपक दत्ता मधे (७) आणि राधिका नितीन केदारी (१४) अशी या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास केला आहे.
गोरक्षनाथ बबन कवठे, त्यांची पत्नी ज्योती कवठे यांची श्रद्धा आणि सायली या दत्तक मुली तर दत्ता मधे यांचा दिपक आणि नितीन केदारी यांची राधिका ही मुलगी आहे. तिन्ही कुटुंबिय मूळचे अहमदनगरच्या संगमनेर, बाळेश्वरचे रहिवाशी आहेत. ते सध्या पुण्यातील आंबेगााव, निरगुडसर परिसरात राहतात. मजुरीचे काम करुन ते त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत होते. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता त्यांचे चारही मुले निरगुडसरच्या शेततळ्यात पोहण्यासाठ गेले होते. शेततळ्यात पाच ते सात फुट पाणी होते. पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते चौघेही बुडू लागले. कोणीच मदतीला नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही माहिती समजताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या चारही मुलांना नंतर मंचर उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली होती. प्राथमिक तपासात या चारही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी पोलिसांना दिला. त्यानंतर त्यांच्या पालकांची पोलिसांनी जबानी नोंदवून पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. सात ते चौदा वयोगटातील या मुलांच्या मृत्यूने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.