मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ मे २०२४
पुणे, – नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच जन्मदात्या पित्याने लैगिंक अत्याचार केल्याचा माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भादवीसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच ३२ वर्षांच्या आरोपी पित्याला वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या चार वर्षांपासून आरोपी हा त्याच्या मुलीवर विविध ठिकाणी लैगिंक अत्याचार करत होता, अलीकडेच मुलीच्या आईला हा प्रकार समजताच तिने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील तक्रारदार महिला ही मूळची पुण्याची असून ती तिच्या आरोपी पती आणि नऊ वर्षांच्या मुलीसोबत राहते. तिचा पती त्याच्या मुलीला वडापावसह खाऊ देतो असे सांगून राहत्या घरासह घरात, भाड्याच्या घरात तसेच वडगावच्या झाडाच्या आडोश्याला अनेकदा लैगिंक अत्याचार करत होता. गेल्या चार वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. हा प्रकार तिने कोणालाही सांगू नकोस म्हणून तिला दम देत होता. गेल्या काही दिवसांपासून या मुलीला प्रचंड त्रास होऊ लागला होता, त्यामुळे तिच्या आईने तिची विचारपूस केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर तिने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तिच्या पतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी ३७६, ३७६ (एम), (२), (फ), ३७६ (२), (एन), भादवी सहकलम ४, ५ (एम), ६, ८, १२ पोक्सो कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी हा प्रकार उघडकीस येताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.