नामांकित कंपनीचे शुद्ध तुप खात असाल तर सावधान
चिराबाजार येथे भेसळयुक्त शुद्ध तुपाच्या विक्रीचा पर्दाफाश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ जून २०२४
मुंबई, – नामांकित कंपनीचे शुद्ध तुप खात असाल तर सावधान. कारण चिराबाजार येथे मुंबई पोलिसांच्या गुन्हे नियंत्रण कक्षाच्या अधिकार्यांनी एका दुकानात छापा टाकून नामांकित कंपनीच्या भेसळयुक्त शुद्ध तुपाची विक्री करणार्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन बंधूंना पोलिसांनी अटक केली आहे. चमन शामू यादव आणि जमन शामू यादव अशी या दोघांची नावे असून ते दोघेही जोगेश्वरीतील रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी एल. टी मार्ग पोलिसाकडे सोपविण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त तुपासह इतर साहित्य जप्त केले आहेत. या टोळीने भेसळयुक्त शुद्ध तुपाची मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री करुन संबंधित कंपन्यासह ग्राहकांची फसवणुक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले.
चिराबाजार येथे काही दुकानात नामांकित कंपन्यांच्या भेसळयुक्त तुपाची विक्री करुन कंपनीसह ग्राहकांची फसवणुक होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष बॅगेहळीख महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती देवकुळे, पोलीस अंमलदार महेश नाईक, गणेश डोईफोडे, चंद्रकांत वलेकर, महेंद्र दरेकर, विशाल यादव यांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधी आणि एफडीए अधिकार्यांच्या मदतीने कारवाई सुरु केली होती. शुक्रवारी या पथकाने चिराबाजार येथील प्लॉट क्रमांक १९१, नानाभाई इमारतीच्या दुकान क्रमांक पंधरामध्ये छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी विविध नामांकित कंपन्यांच्या भेसळयुक्त ७८० लिटर शुद्ध तुपासह अमूल, सागर आणि कृष्णा तुपाच्या ४२५ पिशव्या, स्टिल टाकी, फनेल, प्लास्टिक मग, केतली, पॅकिंग मशिन, अमूल शुद्ध तुपाचे रिकामे पॅकेट असा सुमारे सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर चमन यादव आणि जमन यादव या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध भादवीसह अन्य कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ते दोघेही जोगेश्वरीतील नूरी मशिद, बामरी सेान चाळीत राहत असून त्यांचा चिराबाजार येथे शुद्ध तेल विक्रीचा व्यवसाय आहे.
ते दोघेही त्यांच्या दुकानात डालडा आणि साधा पामतेल मिश्रण करुन त्यात सुगंधी द्रव्य टाकून भेसळयुक्त शुद्ध तेल बनवून त्याची मार्केटमध्ये विक्री करत होते. या तेलाची विक्रीसाठी त्यांनी विविध नामांकित कंपन्यांची तेलाच्या पिशव्याचा वापर केला जात होता. अशा प्रकारे या दोघांनी कंपनीसह अनेक ग्राहकांना भेसळयुक्त तेलाची विक्री करुन त्यांची फसवणुक केली होती. गेल्या एक-दिड वर्षांपासून या दोन्ही बंधूंचा भेसळयुक्त शुद्ध तेल विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही एल. टी मार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. शनिवारी दुपारी दोघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.