36 लाखांच्या शुद्ध सोन्याचा अपहार करुन व्यापार्याचे पलायन
अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून व्यापार्याचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 नोव्हेंबर 2025
मुंबई, – जुलै महिन्यांत सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या 36 लाख रुपयांच्या 352 ग्रॅम वजनाच्या शुद्ध सोन्याचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मकबूल अब्दुल सुबूर एस. के या आरोपी व्यापार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मकबूल हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मकबूलने तक्रारदारासह इतर व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
संजय बाबूलाल जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत भायखळा येथील लवलेन परिसरात राहतात. त्यांचा काळबादेवी येथील आदर्श हॉटेलजवळील मानसिंगा चेंबर्समध्ये सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायात त्यांना त्यांच्या दोन्ही मुले व त्यांची मुले मदत करतात. मकबूल हा ज्वेलर्स व्यापारी असून तो परळ येथील धोबीघाट परिसरात राहतो. तो त्यांच्या परिचित व्यापारी असून गेल्या सहा महिन्यांपासून ते त्याला ओळखतात. अनेकदा संजय जैन हे त्याला शुद्ध सोने देऊन त्याच्याकडून विविध सोन्याचे दागिने बनवून घेत होते.
जुलै महिन्यांत मकबूल हा त्यांच्याकडून 36 लाख 60 हजार 190 रुपयांचे 352 ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने दागिने बनविण्यासाठी घेऊन गेला होता. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना सोन्याचे दागिने बनवून दिले नाही. त्यामुळे ते त्याच्या परळ येथील राहत्या घरी गेले होते, मात्र तिथे गेल्यानंतर त्यांना मकबूल सापडला नाही. चौकशीदरम्यान त्यांना मकबूल हा सोन्याचे दागिने बनवून देतो असे सांगून त्यांच्याकडील 36 लाख 60 हजार रुपयांचे शुद्ध सोने घेऊन पळून गेल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस संजय जैन यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून मकबूलविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी दागिने बनविण्यासाठी दिलेल्या शुद्ध सोन्याचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.