मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मे 2025
मुंबई, – फेरफटका मारताना भरवेगात जाणार्या एका कारने पत्नीसमोरच पतीला उडविल्याची घटना पायधुनी परिसरात घडली. या अपघातात फकरुद्दीन रमजान सय्यद या 37 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक पळून गेला असून त्याच्याविरुद्ध पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या कारचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
हा अपघात मंगळवारी मध्यरात्री साडेतीन वाजता पायधुनीतील पी. डिमेलो रोड, कुर्ला स्ट्रिट परिसरात झाला. जाकीरा फकरुद्दीन सय्यद ही 25 वर्षांची महिला तिचा पती फरुद्दीन व पाच वर्षांचा मुलगा नवाज याच्यासोबत चेंबूर तर तिचे सासू-सासरे मशिदबंदर परिसरत राहतात. तिच्या पतीचा पायधुनी परिसरात रगडा पुरीचा व्यवसाय आहे. तिच्या मुलाचे आधारकार्ड काढायचे होते. त्यामुळे त्यामुळे सोमवारी ती तिच्या मुलासह बहिणीचा मुलगी अल्फीयासोबत तिच्या सासू-सासर्याच्या घरी गेली होती. रात्री तीन वाजता तिचे पती फकरुद्दीन हा कामावरुन तिथे आला होता. यावेळी ते दोघेही तिथे काही वेळ गप्पा मारत बसले होते. काही वेळानंतर ते दोघेही फेरफटका मारण्यासाठी पी. डिमेलो रोडच्या दिशेने जात होते. रात्री साडेतीन वाजता रस्ता क्रॉस करताना अचानक भरवेगात जाणार्या एका अज्ञात कारने तिच्या पतीला जोरात धडक दिली होती.
अपघातानंतर कारचालक तिच्या पतीला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला होता. त्यामुळे तिने जखमी झालेल्या पतीला टॅक्सीने तातडीने जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. सहा वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पायधुनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी जाकीरा सय्यद हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून तिच्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर तो पळून गेला होता, त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.