विश्वासाने दिलेल्या 1.18 कोटीच्या सोन्याचा अपहार करुन फसवणुक
पळालेल्या आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 सप्टेंबर 2025
मुंबई, – विश्वासाने दिलेल्या 1 कोटी 18 लाख रुपयांच्या सोन्याचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार पायधुनी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुमरन शेख या आरोपीविरुद्ध पायधुी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुमरन हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
खेताराम लाखाराम देवासी हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत काळबादेवी परिसरात राहतात. त्यांचा सोन्याचे दागिने बनविणे, सोन्याच्या दागिन्यांची विक्रीचा व्यवसाय आहे. 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत त्याने त्यांचा विश्वासू सहकारी सुरमन शेख याला 1 कोटी 18 लाखांचे 22 आणि 24 कॅरेटचे सोने सोन्याचे नेकलेस बनविण्यासाठी दिले होते. त्याने तीन ते चार दिवसांत नेकलेस बनवून देतो असे सांगितले होते. मात्र ठरलेल्या वेळेस त्याने नेकलेस बनून दिले नाही. त्यामुळे ते त्याला भेटण्यासाठी अब्बास रोड, अविगवाला इमारतीमध्ये गेले होते. यावेळी त्यांना तिथे सुरमन शेख दिसून आला नाही.
चौकशीदरम्यान त्याच्याविषयी कोणालाही काहीही माहिती नव्हती. त्याला कॉल केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. नंतर त्याचा मोबाईल बंद येऊलागला. विश्वासाने दिलेले 1 कोटी 18 लाखांचे सोने घेऊन सुरमन शेख हा पळून गेल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी पायधुनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.