पायधुनी-लोअर परेल येथे नोकराकडून ३९ लाखांची चोरी

दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांची नोंद; एका नोकराला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जानेवारी २०२५
मुंबई, – पायधुनीतील एका ज्वेलरी शॉप आणि लोअर परेल येथील एका फ्लॅटमध्ये सुमारे ३९ लाख ६५ हजारांची चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी पायधुनी आणि ना. म जोशी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. यातील एका गुन्ह्यांतील नोकर सोनेत बेहरुदास वैष्णव याला पायधुनी पोलिसांनी अटक केली तर उत्तरप्रदेशला पळून गेलेल्या शैलेश कुमार यादव या नोकराचा पोलीस शोध घेत आहेत. अटकेनंतर सोनेतला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्याकडून लवकरच चोरीचे सर्व दागिने हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजन मदन कोठारी हे सोन्याचे व्यापारी असून ते लालबाग परिसरात राहतात. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा पायधुनी येथील ज्वेल काऊन इमारतीमध्ये मास्टर चैन प्रायव्हेट लिमिटेड नावाने व्यवसाय चालतो. त्यांच्याकडे अनेक व्यापारी दागिने बनविण्याचे ऑर्डर देतात. या ऑर्डरप्रमाणे त्यांना दागिने बनवून त्यांचा व्यवसाय आहे. काही व्यापार्‍यांना ते होलसेलमध्ये सोन्याच्या दागिन्यांची विक्री करतात. त्यांच्याकडे एकूण २५ कामगार कामाला असून दुकानाचे कामकाज सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत चालते. ४ जानेवारीला गोरेगाव येथील नेस्कोमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे एक प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या शॉपमधील सर्व कामगार दुकानातील काही स्टॉक घेऊन तिथ गेले होते. उर्वरित दागिने त्यांनी शॉपच्या तिजोरीमध्ये ठेवला होता. प्रदर्शन संपल्यानंतर त्यांच्यासह सर्व कामगार शॉपमध्ये आले होते. दागिने तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर सर्वजण त्यांच्या घरी निघून गेले होते.

दुसर्‍या दिवशी ते नेहमीप्रमाणे शॉपमध्ये आले होते. यावेळी त्यांनी तिजोरीतील दागिन्यांची पाहणी केली असता त्यांना काही दागिने कमी असल्याचे दिसून आले. तपासणीनंतर त्यांना सोन्याचे दागिने कमी असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी शॉपमधील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता शॉप बंद होण्यापूर्वी त्यांचा कामगार सोनेत हा तिथे आला होता. त्याने त्याच्याकडील सोन्याच्या दागिन्यांपैकी काही दागिने तिजोरीत ठेवून उर्वरित दागिने बाजूलाच असलेल्या ड्राव्हरमध्ये ठेवला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी आदल्या दिवसातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता सोनेत हा दुकानात आल्यानंतर ड्राव्हरमधून दागिने खिशात टाकत असल्याचे दिसून आले. त्यानेच सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याचे सीसीटिव्ही फुटेजवरुन उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्याकडे विचारणा केली असात त्याने शॉपमधील गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली.

११ ऑगस्ट २०२४ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीत त्याने एकूण २५ लाख २५ हजार रुपयांचे ३०८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार पायधुनी पोलिसांना सांगून तिथे सोनेतविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच सोनेत वैष्णव याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे. सोनेत हा मूळचा राजस्थानचा रहिवाशी असून तो काही महिन्यांपासून राजन कोठारी यांच्याकडे कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुसरी घटना लोअर परेल परिसरात घडली. मेघा राहुलकुमार गुप्ता ही महिला ज्वेलर्स व्यापारी असून तिचा इमिटेशन ज्वेलरीचा विक्रीचा व्यवसाय आहे. जुलै २०२४ तिने लोअर परेल येथे एक फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटमध्ये दुरुस्तीचे काम असल्याने तिने प्रसिद्धनाथ या कॉन्टॅ्रक्टरला फ्लॅटच्या दुरुस्तीचे कंत्राट दिले होते. त्यामुळे तिच्या फ्लॅटमध्ये कामासाठी काही कामगार येत होते. त्यात प्रसिद्धनाथ यांच्या शैलेशकुमार या कामगाराचा समावेश होता. तो त्यांच्या घरी मार्बलचे काम करत होता. १३ जानेवारीला त्याला त्याच्या उत्तरप्रदेशातील बस्ती गावी जायचे होते. त्यामुळे मेघाच्या पतीने त्याला एक बॅग दिली होती. १५ जानेवारीला तिने तिच्या कपाटातील बॅगेची तपासणी केली असता तिला सुमारे साडेचौदा लाखांचे सोन्याचे विविध दागिने, सोन्यासह चांदीचे कॉईन, हिर्‍यांची रिंग आणि दिड लाखांची कॅश असा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. शैलेश यानेच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन तिने त्याच्याविरुद्ध ना. म जोशी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तो उत्तरप्रदेशला पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच उत्तरप्रदेशला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page