अनैतिक संबंधाला अडसर म्हणून मूकबधीर पतीचा काटा काढला

प्रियकरानंतर पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – अनैतिक संबंधाला पती अडसर आहे म्हणून अर्शदअली सादिकअली शेख या ३० वर्षांच्या तरुणाची हत्या झाली असून या हत्येसाठी प्रियकराला मदत केल्याप्रकरणी आरोपी पत्नीला अखेर पायधुनी पोलिसांनी अटक केली आहे. रुक्साना अर्शदअली शेख असे या महिलेचे नाव असून अटकेनंतर तिला माझगाव येथील लोकल कोर्टाने १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत शिवजीत सुरेंद्र सिंग आणि जय प्रविण चावडा या दोघांना यापूर्वी पायधुनी पोलिसांनी अटक केली असून ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. यातील जयसोबत रुक्सानाचे अनैतिक संबंध होते. याच संबंधातून जयने अर्शदअलीची हत्या करुन त्याच्या विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा हा प्रयत्न फसला गेला आणि अवघ्या चार तासांत पोलिसांनी हत्येचा पर्दाफाश केला. यातील मृत अर्शदअली, अटक आरोपी रुक्साना, जय आणि शिवजीत हे चौघेही मूकबधीर असून आरोपींच्या चौकशीसाठी माझगाव येथील बॉम्बे इन्स्टिट्यूशन फॉर डेफ ऍण्ड म्युट्स शाळेचे शिक्षक आयाझ अहमद नझीर शेख यांची मदत घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जय, शिवजीत आणि अर्शदअली हे तिघेही चांगले मित्र असून त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. रविवारी जयने त्याच्या पायधुनीतील राहत्या घरी शिवजीत आणि अर्शदअलीला गटारीच्या पार्टीसाठी बोलाविले होते. तिथेच अर्शदअलीला पाजून जयने शिवजीतच्या मदतीने त्याची हत्या केली होती. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने त्याचा मृतदेह एका ट्रॉली बॅगेत भरला. ही बॅग घेऊन तो दादर रेल्वे स्थानकात आला होता. तुतारी एक्सप्रेस प्रवास करुन ही बॅग त्याला चालत्या ट्रेनमधून फेंकून हत्येचा पुरावा नष्ट करायचा होता. मात्र त्यापूर्वीच त्याला एका आरपीएफच्या कर्मचार्‍याने पकडले. बॅगेची तपासणी केल्यांनतर अर्शदअलीच्या हत्येचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल होताच या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. जयला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन पगार व त्यांच्या पथकाने उल्हासनगरला पळून गेलेल्या शिवजीतला अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही माझगावच्या लोकल कोर्टाने १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मृत आणि आरोपी मूकबधीर होते. त्यामुळे आरोपींच्या चौकशीसाठी पोलिसांनी आयाझ शेख यांची मदत घेतली होती. आरोपींकडे विचारलेल्या प्रश्‍नांची आयाझ शेखकडून उत्तर मिळविण्याचा पोलीस प्रयत्न करत होते. या चौकशीदरम्यान अनेक गोष्टींचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. चौकशीदरम्यान जय या कटाचा मुख्य आरोपी असून त्याने कट रचून अर्शदअलीची हत्या केल्याचे उघडकीस आले. याकामी त्याला शिवजीतने मदत केली होती. त्याच्या राहत्या घरातून पोलिसंनी काही भौतिक पुरावे गोळा करुन ते विश्‍लेषणासाठी सांताक्रुजच्या कालिना, न्यायवैदयक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

अर्शदअलीची हत्या करण्याचे जयने त्याचे मोबाईलवर शूटींग केले होते. ते व्हिडीओ त्याने दोन व्यक्तींना पाठविले होते. त्यात अर्शदअलीची पत्नी रुक्सना आणि दुबईतील एका व्यक्तीचा समावेश होता. दोन्ही आरोपीच्या मोबाईलची माहिती काढताना जयचे अर्शदअलीची पत्नी रुक्सानासोबत चॅट, व्हाईट तसेच व्हिडीओ कॉल झाल्याचे उघडकीस आले. रुक्साना आणि जय यांचे प्रेमसंबंध होते. ते दोघेही एकमेकांच्या नियमित संपर्कात होते. या माहितीनंतर अर्शदअलीचा भाऊ अशरफ अली आणि त्याची पत्नी रुक्सानाची पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. रुक्साना हीदेखील मूकबधीर असल्याने ती तपासात सहकार्य करत नव्हती. प्रत्येक प्रश्‍नांना उडवाडवीचे उत्तर देत होती. अखेर तिने तिचे जय चावडासोबत प्रेमसंबंध तसेच तो अर्शदअलीची हत्या करणार असल्याची माहित असल्याचे सांगितले. या हत्येसाठी आर्थिक व्यवहार झाले होते. मात्र ही माहिती असूनही तिने याबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती. या गुन्ह्यांत तिचा सहभाग उघडकीस येताच तिला बुधवारी पायधुनी पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर तिला गुरुवारी दुपारी माझगाव येथील स्थानिक न्यायालयाने सोमवार १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीत तिने हत्येसाठी आर्थिक व्यवहार झाल्याची कबुली दिली होती, या व्यवहाराची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. हत्येनंतर जयने दुबईतील एका व्यक्तीला हत्येचे फोटोसह व्हिडीओ पाठविले होते. या गुन्ह्यांत त्याचा काय रोल आहे, तो कोण आहे याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. आरोपींच्या मोबाईलमधील माहिती काढून पोलिसांनी जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे. अर्शदअलीची हत्या करुन जय हा तुतारी एक्सप्रेसने प्रवास करणार होता, चालत्या ट्रेनमधून बॅग बाहेर फेंकून त्याला हत्येचा पुरावा नष्ट करायचा होता, मात्र त्याची ही योजना आरपीएफ संतोषकुमार यादव याच्यामुळे फसली गेल्याचा संशय पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी व्यक्त केली. या गुन्ह्यांत जयने इतर कोणाची मदत घेतली होती, या कटाची इतर कोणाला माहिती होती का याचा तपास पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक नितीन पगार व त्यांचे सहकारी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page