व्हिडीओ कॉलवर जोरात बोलतो म्हणून मजुराची हत्या

हत्येनंतर पळून गेलेल्या मारेकर्‍याला काही तासांत अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 फेब्रुवारी 2026
मुंबई, – व्हिडीओ कॉलवर जोरात बोलतो म्हणून झालेल्या वादातून विपुल कमरोती कर्मकार या 39 वर्षांच्या मजुराची त्याच्याच परिचित आरोपीने बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना मशिदबंदर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या इब्राहिम कालू शेख या 19 वर्षांच्या आरोपीस पायधुनी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

ही घटना सोमवारी दुपारी एक ते दिडच्या सुमारास मशिदबंदर येथील दानाबंदर, क्लाईव्ह रोडच्या लोकप्रिय सरकारमान्य देशी दारुच्या दुकानासमोर घडली. बिश्वोजीत विकास साहा हा तरुण डोंगरीतील ठाणे स्ट्रिट परिसरात राहत असून त्याचा साऊंड सिस्टीम लावण्याचा व्यवसाय आहे. त्याचे इब्राहिम शेख आणि विपुल कर्मकार हे दोघेही परिचित आहेत. यातील विपुल हा मजुरीचे काम करत तर इब्राहिम काहीच कामधंदा करत नाही. ते दोघेही मशिदबंदर येथील क्लाईव्ह रोड, साईबाबा मंदिराजवळील झोपडीत राहतात. एकाच परिसरात राहत असल्याने इब्राहिम आणि विपुल हे एकमेकांचे परिचित असून चांगले आहेत.

सोमवारी दुपारी एक वाजता विपुल हा त्याच्या मोबाईलवरुन व्हिडीओ कॉलवरुन एका मुलीशी बोलत होता. कॉलवर तो जोरजोरात बोलत असलने त्याला इब्राहिमने हळू आवाजात बोलण्यास सांगेगितले. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. या वादातून इब्राहिमने विपुलला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. या मारहाणीनंतर त्याने त्याला सिमेंटच्या रस्त्यावर आपटून त्याला गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यात विपुल हा रक्तबंबाळ झाला होता. या घटनेनंतर इब्राहिम तेथून पळून गेला होता.

हा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी झालेल्या विपुलला तातडीने जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच पायधुनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी बिश्वोजीत साहा याच्या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर त्याच्याच तक्रारीवरुन पोलिसांनी इब्राहिमविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना पळून गेलेल्या इब्राहिमला मंगळवारी पहाटे पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. व्हिडीओ कॉलवरुन जोरात बोलण्यावरुन ही हत्या झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page