मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जून २०२४
मुंबई, – सुमारे अठरा लाखांची सोन्याची लगड चोरी करुन पळून गेलेल्या एका वॉण्टेड नोकराला पायधुनी पोलिसांनी पुण्यातून अटक केली. जिन्नत मलिक शेख ऊर्फ प्रितम रोबी मंडल असे या ३० वर्षांच्या आरोपी नोकराचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
आशिष अनंतो मैती हे सोने कारागिर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत डोबिवली परिसरात राहतात. त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय असून पायधुनी येथे त्यांचा एक कारखाना आहे. १० ऑक्टोंबर २०२३ रोजी त्यांच्याकडे कामाला असलेल्या प्रितमने त्यांच्या कारखान्यांतील तिजोरीतून १८ लाखांचे ३२० ग्रॅम वजनाचे सोन्याची लगड चोरी करुन पलायन केले होते. दुसर्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी पायधुनी पोलिसांत प्रितमविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला होता. तपासादरम्यान प्रितमचे खरे नाव जिन्नत शेख असून तो मूळचा कोलकाताचा रहिवाशी असल्याचे समजले होते. मुंबईतून चोरी करुन पळून गेल्यानंतर जिन्नत हा पुण्यात गेला होता. तिथे काही दिवस राहिल्यानंतर त्याने पुण्यातील फराजखाना परिसरातून अशाच प्रकारे एक चोरी केली होती. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध फराजखाना पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच जिन्नतला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो न्यायालयीन कोठडीत होता.
चौकशीदरम्यान त्याने पायधुनीतील चोरीच्या गुन्ह्यांतील कबुली दिली होती. त्यामुळे त्याचा ताबा पायधुनी पोलिसांनी घेतला होता. याच गुन्ह्यांत ताबा घेतल्यानंतर त्याला शनिवारी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने चोरीची सोन्याची लगडची विक्री केली असून ती लवकरच पोलिसांकडून हस्तगत केली जाणार आहे. जिन्नत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दोन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.