२६/११ चा साक्षीदार असलेल्या सेनेच्या पदाधिकार्याला बेड्या
अभिषेक बॅनर्जीच्या घरासह कार्यालयात रेकी करणे महागात पडले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ मार्च २०२४
मुंबई, – तुणमूल कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घरासह कार्यालयाजवळ रेकी करणे राजाराम रेगे याला चांगलेच महागात पडले आहे. याच प्रकरणात त्याला कोलकाता पोलिसांनी माहीम पोलिसांच्या मदतीने अटक करुन पुढील चौकशीसाठी कोलकाता येथे नेले. राजाराम हा २६/११ च्या मुंबई शहरात झालेल्या आत्मघाती हल्ल्यातील खटल्याचा प्रमुख साक्षीदारासह शिवसेनेचा पदाधिकारी आहे. त्याची सध्या कोलकाता पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अभिषेक बॅनर्जी हे कोलकाताचे मुख्यमंत्री ममता बॅनजीचे नातेवाईक असून डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघाचे तुणमूल पार्टीचे खासदार तसेच राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरासह कार्यालयाची अज्ञात व्यक्तींनी रेकी केली होती. हा प्रकार नंतर अभिषेक यांच्या निदर्शनास येताच त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती. या तक्रारीची वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यांनतर राजाराम रेगे हा दिसून आला होता. राजाराम हा मुंबईचा रहिवाशी असून तो माहीम परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर कोलकाता पोलिसांनी गुप्तहेर विभाग आणि माहीम पोलिसांच्या मदतीने राजाराम रेगे याला माहीम येथून ताब्यात घेतले होते. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी कोलकाता येथे नेण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हेगारी कट रचून धमकावणे आदी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. तपासात राजाराम हा शिवसेनेचा माजी पदाधिकारी असून मुंबई शहरात झालेल्या आत्मघाती हल्ल्यातील खटल्यातील एक प्रमुख साक्षीदार आहे. त्याचा संगणकशी संबंधित व्यवसाय आहे. २६/११ च्या आत्मघाती हल्ल्यातील मुख्य आरोपी हेव्हीड हेडलीचा राजाराम हा कथित मित्र असल्याचे बोलले जाते.
मुंबईतील हल्ल्यापूर्वी डेव्हीड हा मुंबईत आला होता. यावेळी त्याची राजारामशी दादरच्या शिवसेना भवन येथे भेट झाली होती. डेव्हीने त्याला पार्टनरशीपमध्ये व्यवसाय सुरु करण्याचीही ऑफर दिली होती. शिकागो येथील एका लोकल कोर्टात एका व्यक्तीला दादर येथील शिवसेना भवनात भेटल्याची डेव्हीडने कबुली दिली होती. ती व्यक्ती अन्य कोणी नव्हे राजाराम रेगे हाच होता. कोलकाता येथे वास्तव्यास असताना तो दक्षिण कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये राहत होता. याच दरम्यान त्याने अभिषेक बॅनजी आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा मोबाईल क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्याने त्यांना फोन करुन भेटण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र त्याची भेट झाली नाही. राजाराम हा काही संशयित व्यक्तींच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याची कोलकाता पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. राजारामची यापूर्वी मुंबईसह स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणेने चौकशी केली होती. या चौकशीनंतर तो मुंबई शहरातील आत्मघाती हल्ल्याच्या खटल्याचा एक साक्षीदार झाला होता.