मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 फेब्रुवारी 2025
मुंबई, – घरफोडीसह हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत खटल्याच्या सुनावणीदरम्यान सतत गैरहजर राहणार्या अजामिनपात्र वॉरंट बजाविलेल्या दोन वॉण्टेड आरोपींना गजाआड करण्यात रफि अहमद किडवाई मार्ग आणि अॅण्टॉप हिल पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. हबीबुल भोलू इमामबक्श शेख ऊर्फ भुल्लू आणि कूप्पन मारीअप्पन देवेंद्र अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही शिवडीसह विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
हबीबुल शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध 2003 साली आरएके मार्ग पोलिसांनी एका घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी त्याला लोकल कोर्टाने जामिन मंजूर केला होता. याच गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध नंतर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची नियमित सुनावणी शिवडीतील लोकल कोर्टात सुरु होती. मात्र जामिनावर बाहेर येताच हबीबुल हा पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीदरम्यान सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट जारी करताना त्याच्या अटकेचे आदेश आरएके मार्ग पोलिसांना दिले होते. याच गुन्ह्यांत फरार आरोपी घोषित करण्यात आले होते. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला उत्तरप्रदेशच्या बांदा, बबेरु येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणून शिवडी कोर्टात हजर करण्यात आले होते.
अशाच दुसर्या घटनेत अॅण्टॉप हिल पोलिसांनी कूप्पन देवेंद्र या वॉण्टेड आरोपीस अटक केली. कूप्पन हा सायन-कोळीवाडा, इंदिरानगर परिसरात राहत होता त्याच्याविरुद्ध 2012 साली हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला कोर्टाने जामीन मंजुर केला होता, मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट जारी करताना त्याला फरार आरोपी घोषित केले होते. त्याचा पोलिसांचा पोलिसांनी शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना फरार असलेल्या कूप्पनला अॅण्टॉप हिल पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले. ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, पोलीस उपनिरीक्षक अरफात सिद्धीकी व त्यांच्या पथकाने केली.