घातक शस्त्रांचा धाक दाखवून 2.29 कोटीचे दागिने पळविले
शिवडीतील दिवसाढवळ्या घडलेल्या रॉबरीच्या घटनेने तणाव
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पिस्तूलसारख्या घातक शस्त्रांचा धाक दाखवून, जिवे मारण्याची धमकी देत दोन अज्ञात व्यक्तीने मास्टरचैन अॅण्ड ज्वेल्स कंपनीच्या दोन कर्मचार्यांना धमकावून त्यांच्याकडील 2 कोटी 29 कोटीचे हॉलमार्कसाठी नेण्यात येणारे विविध सोन्याचे दागिने घेऊन पलायन केल्याची घटना शिवडी परिसरात घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या रॉबरीच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि शस्त्र अधिनियिम कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
ही घटना सोमवारी दुपारी अडीच ते पावणेतीन वाजता शिवडी येथील झकेरिया बंदर रोड, शिवडी कोर्टजवळील आरएके चार रोडजवळ घडली. शामलाभाई होथीभाई रबारी हे मूळचे गुजरातच्या बनासकाटाचे रहिवाशी असून सध्या ते काळाचौकी परिसरात राहतात. गेल्या दहा वर्षांपासून शामलाभाई हा मास्टरचैन अॅण्ड ज्वेल्स कंपनीत कामाला आहे. या कंपनीत सोन्याचे विविध डिझाईनचे सोन्याचे दागिने बनविण्याचे काम चालते. मदन कोठारी हे कंपनीचे मालक असून त्यांच्यासह त्यांचा मुलगा राज कोठारी हे संपूर्ण युनिटचे कामकाज पाहतात. पायधुनी परिसरात कंपनीचे मुख्य कार्यालय तर कॉटनग्रीन परिसरात दागिने बनविण्याचा कारखाना आहे. दागिने बनवून झाल्यानंतर कंपनीकडून ते दागिने हॉलमार्कसाठी शिवडीतील क्लॉलिटी अस्साय अॅण्ड हॉलमार्क कंपनीकडे पाठवते.
शनिवारी 11 ऑक्टोंबरला कंपनीचे सुरक्षारक्षक सुरेश सिंग आणि डिलीव्हरी बॉय जोगाराम देवाशी यांनी कारखान्यातून अनुक्रमे 1388.757 व 678.367 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मुख्य कार्यालयात पाठविले होते. सोमवारी कंपनीचे मॅनेजर दिपककुमार प्रजापती यांनी शामलाभाई रबारीला कॉल करुन ते दागिने हॉलमार्कसाठी शिवडी येथे पाठविण्यास सांगितले होते. त्यामुळे शामलाभाई हा कंपनीचा डिलीव्हरी बॉय जगदीश केराभाई याच्यासोबत त्याच्या बाईकवरुन 2 कोटी 29 लाख 40 हजार रुपयांचे 2067.143 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन शिवडी येथे घेऊन जात होते. ही बाईक झकेरिया बंदर रोडवर येताच एका बाईकस्वाराने त्यांच्या बाईकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
बाईकमधील दोघांनी त्यांच्याकडील दागिने असलेली बॅग खेचण्याचा प्रयत्न केला, यावेळी शामलाभाई आणि जगदीश यांनी त्यांचा प्रतिकार करुन बॅग देण्यास नकार दिला. याच दरम्यान जगदीश हा दागिने असलेली बॅग घेऊन पळू लागला. याच दरम्यान एका व्यक्तीने त्याच्याकडील पिस्तूलसारख्या घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडे बॅगेची मागणी केली. दिवसाढवळा हा प्रकार घडल्याने तिथे उपस्थित लोक घाबरले, सर्वजण घातक शस्त्रे पाहून पळू गेले. हीच संधी साधून त्यांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने असलेली बॅग घेऊन बाईकवरुन पलायन केले होते.
या घटनेनंतर त्यांनी ही माहिती राज कोठारी यांना दिली. त्यांनी त्यांना तातडीने पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शामलाभाई आणि जगदीश हे दोघेही रफि अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. याप्रकरणी शामलाभाईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून रॉबरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दिवसाढवळ्या घडलेल्या या रॉबरीच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहे. या आदेशांनतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.