प्रेमासाठी दबाव आणून 23 वर्षांच्या तरुणीला धमकी देण्याचा प्रयत्न
दहा वर्षांपासून मानसिक शोषण करणार्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – एकतर्फी प्रेमातून एका 23 वर्षांच्या तरुणीवर प्रेमासाठी दबाब आणून तिला तिच्याच परिचित तरुणाने अप्रत्यक्ष धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार शिवडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी हेमंत संतोष वैनेगरा ऊर्फ पापुडा या 21 वर्षांच्या तरुणाविरुद्ध रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून हेमंत वैनेगरा हा तक्रारदार तरुणीचा मानसिक शोषण करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.
23 वर्षांची तक्रारदार तरुणी ही शिवडी परिसरात राहते. तिचे सावत्र पिता मर्चंट नेव्हीमध्ये तर ती स्वत एका खाजगी कंपनीत कामाला आहे. पूर्वी ते सर्वजण शिवडीतील दगडी चाळीत राहत होते. तिथे हेमंत हादेखील राहत होता. त्यामुळे ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. हेमंत हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. दहा वर्षांपूर्वी ती शाळेत असताना तो तिच्या मागे शाळेत येत होता. तिच्याशी मैत्री करावी यासाठी तो तिच्यावर दबाव आणत होता. मात्र तिने त्याला कधी प्रतिसाद दिला नाही. त्याचा त्याला प्रचंड राग होता. तिने तिच्याशी मैत्री करावी यासाठी तो तिचा सतत मानसिक शोषण करत होता.
तिच्यावर मैत्रीसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिने तिच्या पालकांना हा प्रकार सांगितला होता. तिच्या पालकांनी हेमंतच्या पालकांकडे तक्रार करुन त्याची समजूत काढण्याचा सल्ला दिला होता. तरीही त्याच्यात काहीही फरक पडला नव्हता. समजूत घालूनही तो सतत तिचा पाठलाग करत होता. तु माझ्याशी मैत्री कर, तू मला आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेल असे सांगून तिला पुन्हा पुन्हा पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार नेहमीचा झाल्याने तिने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती.
शनिवारी 27 सप्टेंबरला ती नेहमीप्रमाणे तिच्या कामावर जाण्यासाठी निघाली होती. यावेळी शिवडीतील स्कायवॉक ब्रिजवर हेमंत आला आणि त्याने पुन्हा तिला मैत्रीसह लग्नासाठी प्रपोज केले होते. यावेळी त्याने तिचा हात पकडून तिच्याशी असभ्य वर्तन करुन तु माझ्याशी प्रेम केले नाहीतर अप्रत्यक्ष तिला धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तेथून पळून गेली.
घडलेला प्रकार तिने तिच्या पालकांना सांगून त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने रफि अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हेमंत वैनेगरा याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत संबंधित आरोपीविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहे.