सत्तर गुन्ह्यांची नोंद असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार गजागाड
कारसह कारमधील महागडे साहित्य चोरी करत असल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 ऑगस्ट 2025
मुंबई, – सत्तरहून अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अटक केली. जुनैद युनूस शेख ऊर्फ बंबय्या असे या 35 वर्षी गुन्हेगाराचे नाव असून त्याच्या अटकेने मुंबईसह पुण्यातील दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, पुणे, पुणे ग्रामीण, गुजरातच्या विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. जुनैद हा कारसह कारमधील महागडे साहित्य चोरी करण्याच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संजय पांडुरंग ठोंबरे यांची 26 जून ते 30 जून 2025 या कालावधीत वडाळ्यातील युंगाडा पेट्रोलपंपाजवळील पार्क केलेली कार अज्ञात चोरट्याने चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी आरएके मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. वडाळा, शिवडी, काळाचौकी, कॉटनग्रीन, माझगाव, भायखळा, जे. जे मार्ग, नागपाडा, वरळी, मुंबई सेंट्रल, दादर आणि माटुंगा परिसरातील सुमारे दिडशेहून अधिक सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या फुटेजवरुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांतील आरोपी सांताक्रुज परिसरात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप ऐदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद खैरे, महेश मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश घार्गे, पोलीस हवालदार अनिल कोळेकर, काशिनाथ शिवमत, रोशन कांबळे, गोविंद ठोके, पोलीस शिपाई समिकांत म्हात्रे, अमीत रामसिंग यांनी सांताक्रुजच्या लिकिंग रोड परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून जुनैद शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच ही कार चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी कारसह तीन चोरीचे मोबाईल जप्त केले आहे. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात त्याने चोरी केलेल्या कारचा वापर पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील गुन्हयांत केल्याचे उघडकीस आले.
जुनैदविरुद्ध गुजरातच अहमदाबाद, सुरत, वापी, वलसाड, आनंदनगर, जुनागड, उमरा, पुण्यासह पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पालघर, मिरा-भाईंदर, वसई, विरार, मुंबई आणि नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात सत्तरहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या अटकेने मुंबईसह पुण्यातील दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.