डॉक्टर पूत्राला सहकार्यांनीच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले
दहा महिन्यानंतर चार सहकारी अधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – सततच्या अपमानास्पद वागणुकीला आणि कामाला अतिरिक्त ताणामुळे अभिनव अनिलकुमार सपारे या बंगलोरच्या एका नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टर पूत्राला त्याच्याच चार वरिष्ठ सहकार्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी अभिनवच्या वडिलांच्या तक्रारीवरुन रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी चारही अधिकार्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरण गुन्हा दाखल केला आहे. प्रतिक अग्रवाल, ध्रुव भाटिया, श्रेयास मानू राय आणि सुनिल संघाई अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांनाही लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. याा चौघांमुळे अभिनवने त्याच्या राहत्या निवासी इमारतीच्या २१ व्या मजल्यावरुन आत्महत्या केली होती असा आरोपच त्याच्या वडिलांनी त्यांच्या तक्रार अर्जात केल्याचे पोलिसांनी सांगितले.
बंगलोरचे रहिवाशी असलेले अनिलकुमार पांडुरंगराव सपारे हे बालरोग तंज्ञ असून तेथीलच नारायणा हेल्थ या खाजगी नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यांचा अभिनव हा २६ वर्षांचा मुलगा असून त्याने ६ जानेवारी २०२४ रोजी त्याने त्याच्या राहत्या इमारतीच्या सोळा मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येला प्रतिक अग्रवाल, ध्रुव भाटिया, श्रेयास राय आणि सुनिल संघाई हे त्याच्याच कंपनीच्या सहकार्याच्या जाचाला कंटाळून आणि अपमानास्पद वागणुकीमुळे केल्याचा आरोप अनिलकुमार सपारे यांनी केला होता. त्यांचा मुलगा अभिनव हा प्रचंड हुशार, कष्टाळू, मनमिळावू आणि महत्त्वाकांक्षी स्वभावाचा होता. शाळेत आणि कॉलेजमध्ये तो चांगल्या गुणांनी उर्त्तीर्ण झाला होता. फायनान्स क्षेत्रात करिअर करायचे असल्याने त्याने एमबीए फायनान्ससाठी प्रवेश घेतला होता. त्याने कॅट परिक्षेत ९८ टक्के गुण घेऊन अंधेरीतील एस. पी. जैन इन्स्ट्यिटूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेतला होता. याच दरम्यान तो शिवडीतील टी. जे रोड, दोस्ती फ्लेंमिंगो अपार्टमेंटच्या २१ व्या मजल्यावर त्याच्या सहकारी मित्रांसोबत राहत होता. मे २०२३ ररोजी तो एका खाजगी कंपनीत रुजू झाला होता. दोन महिने सर्व सुरळीत सुरु होते. मात्र अचानक त्याच्यावर कामाचा प्रचंड ताण पडत होता. त्यामुळे त्याच्या जेवणासह झोप, व्यायाम आदीवर परिणाम झाला होता. अनेकदा तो कामाचा अतिरिक्त ताण असल्याचे सांगत होता.
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत तो अठरा ते वीस तास काम करत होता. त्यामुळे त्याच्या तब्येतीवर खूप परिणाम झाला होता. गेल्या वर्षी तो नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत सुट्टीवर त्याच्या घरी आला होता. सुट्टीवर असतानाही तो घरी तासनतास बसून काम करत होता. याच दरम्यान त्याने त्याच्या चार सहकार्याबाबतच्या वाईट वागणुकीबाबत त्यांच्याशी चर्चा केली होती. त्याला ते अपमानस्पद वागणुक देत असल्याचे तसेच त्याच्याकडून कठोर परिश्रम घेत असल्याचे सांगत होता. जानेवारी महिन्यांत त्याच्या एका सहकार्याने राजीनामा दिल्यानंतर त्याच्यावर प्रतिक भाटिया आणि श्रेयांस राय याच्याकडून प्रचंड कामाची जबाबदारी देण्यात आली होती. या चौघांच्या वागणुकीमुळे अनेकांनी कंपनीचा राजीनामा दिला होता. त्यांच्याकडून होणार्या अपमानास्पद वागणुकीला अभिनव प्रचंड कंटाळून गेला होता. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने ६ जानेवारीला त्याच्या राहत्या इमारतीच्या २१ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती.
हा प्रकार नंतर लक्षात येताच अनिलकुमार सपारे यांनी चारही अधिकार्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका सादर करुन दोषीवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची विनंती केली होती. या याचिकेवर अलीकडेच सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी न्यायालयाने संबंधित चारही अधिकार्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक एस. एस नदाफ यांनी अनिलकुमार सपारे यांची जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत त्यांनी त्यांचा मुलगा अभिनव सपारे याच्या आत्महत्येला प्रतिक अग्रवाल, ध्रुव भाटिया, श्रेयांस राय आणि सुनिल संघाई हेच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. या जबानीनंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. या चारही अधिकार्यांनी लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.