मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० फेब्रुवारी २०२४
मुंबई, – लैगिंक अत्याचाराचा आरोप असलेल्या एका ३३ वर्षांच्या आयटी इंजिनिअर आरोपीने सोमवारी वनराई पोलीस ठाण्यातून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या अमोल बोराडे या आरोपीस चेंबूर येथून मंगळवारी वनराई पोलिसांनी अटक केली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामपियारे राजभर यांनी दुजोरा दिला असून त्याची चौकशी सुरु असल्याचे सांगितले.
अमोल हा अंधेरीतील कोलडोंगरी परिसरात राहतो. त्याचे एमबीएपर्यंत शिक्षण झाले असून तो सध्या एका खाजगी कार्पोरेट कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून कामाला आहे. या कंपनीत पिडीत ४३ वर्षांची विधवा महिला काम करत असून तो तिला गेल्या दोन वर्षांपासून ओळखतो. एकाच ठिकाणी काम करत असल्याने ते एकमेकांच्या परिचित होते. त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली होती. मात्र अमोल तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. याबाबत त्याने तिला विचारणा केली होती. मात्र तिने त्यास नकार देत मैत्रीचे नात ठेवण्याची विनंती केली होती. दोन दिवसांपूर्वी ते दोघेही एकत्र भेटले होते. यावेळी त्याने तिला जबदस्तीने मद्यप्राशन करण्यास प्रवृत्त केले होते. मद्यप्राशन केल्यानंतर त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता.
हा प्रकार नंतर तिच्या लक्षात येताच तिने वनराई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगितला होता. तिच्या तक्रारीनंतर अमोलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन वनराई पोलीस ठाण्यात आणले होते. तिथे त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद होत असताना तो पोलीस ठाण्यातून पळून गेला होता. अमोल पळून गेल्याचे लक्षात येताच त्याचा पोलिसांनी शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. ही शोधमोहीम सुरु असताना तो चेंबूर येथे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामपियारे राजभर यांच्या पथकाने मंगळवारी अमोलला चेंबूर येथून अटक केली. त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंद झाल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला बुधवारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे.