मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 मे 2025
मुंबई, – गरोदर प्रेयसीशी लग्न करण्यास नकार देणार्या प्रियकराला शनिवारी कफ परेड पोलिसांनी अटक केली. राजेश अर्जुन नाडर असे या 31 वर्षीय आरोपी प्रियकराचे नाव असून त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्याला रविवारी किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तुझ्या पोटातील बाळ माझे नाही असे सांगून त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्यानतर पिडीत प्रेयसीने कफ परेड पोलिसात तक्रार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
20 वर्षांची पिडीत तरुणी ही कफ परेड परिसरात राहते. तिला एक लहान भाऊ असून तिचे मासेमारीचा व्यवसाय तर आई घरकाम करते. त्यांच्या घरी एक पाळीव कुत्रा असून त्याला घेऊन ती नियमित सकाळी आणि सायंकाळी फिरायला घेऊन जाते. याच दरम्यान तिची त्याच परिसरात राहणार्या राजेशशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री झाली होती. काही दिवसांनी त्याला तिला प्रपोज करुन लग्नाची मागणी घातली होती. राजेशची आई घाटकोपर येथे राहते तर राजेश हा कफ परेड येथे एकटाच राहत होता. त्यामुळे तो तिला घेऊन त्याच्या घरी येत होता. तिथेच त्यांच्यात दोघांच्या संमतीने अनेकदा शारीरिक संबंध आले होते. याच संबंधातून ती गरोदर राहिली होती.
फेब्रुवारी महिन्यात तिला मासिक पाळी आली नाही. त्यामुळे तिने प्रेंग्नेट किट आणून चाचणी केली असता तिला ती गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर तिने राजेशकडे लग्नाविषयी विचारणा सुरु केली होती, मात्र तो तिला प्रतिसाद देत नव्हता. नंतर त्याने तिच्याशी लग्नास नकार देत तिच्या पोटातील बाळ आपण नाही असे दावा केला होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यांनी तिला राजेशविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगून राजेशविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच शनिवारी त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.