चार वर्षांनी बलात्कारी आरोपीस उत्तराखंड येथून अटक

विरार गुन्हे शाखेच्या तीनची हरिद्वार येथे कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑगस्ट २०२४
विरार, – घरात कोणीही नसल्याची संधी साधून एका १९ वर्षांच्या तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार करणार्‍या बलात्कारी आरोपीस चार वर्षांनी विरार गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या अधिकार्‍यांनी उत्तराखंडच्या हरिद्वार येथून अटक केली. अनिल ओमप्रकाश बिडलान असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तराखंडचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी नालासोपारा पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

पिडीत तरुणी ही नालासोपारा येथे राहते. १६ सप्टेंबर २०२१ रोजी ती तिच्या घरी एकटीच होती. यावेळी तिच्या घरी अनिल आला. काही कळण्यापूर्वीच त्याने तिचे तोंड हाताने दाबून ओरडलीस तर जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देऊन तो पळून गेला होता. या प्रकारानंतर पिडीत तरुणी प्रचंड घाबरली होती. तरीही तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगून अनिलविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर नालासोपारा पोलिसांनी अनिल बिडलानविरुद्ध ३७६, ५०६ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. मात्र गुन्हा दाखल होताच तो नालासोपारा येथून पळून गेला होता. गेल्या चार वर्षांपासून त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत होते. मात्र तो प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देत होता.

या घटनेची पोलीस आयुक्त मधुकर पांण्डेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस मदन बल्लाळ यांनी गंभीर दखल सर्वच गुन्हे शाखेच्या युनिटला आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, आश्‍विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील युवराज वाघमोडे, सुमीत जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनावणे यांनी सायबर सेलचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असतानाच अनिल हा उत्तराखंडच्या हरिद्वार परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने हरिद्वार येथून गेल्या चार वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या अनिलला शिताफीने अटक केली. चौकशीत त्यानेच पिडीत तरुणीवर जिवे मारण्याची धमकी देऊन लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली. अनिल हा मूळचा उत्तराखंडच्या हरिद्वार, सेक्टर चार भेल, नर्वोदयनगर गोकुळधाम सोसायटीचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी नालासोपारा येथे आणण्यात आले. याच गुन्ह्यांत त्याचा ताबा नालासोपारा देण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page