मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 जून 2025
मुंबई, – लैगिंक अत्याचाराासह फसवणुकीप्रकरणी आरोपी प्रियकराला अखेर कांदिवली पोलिसांनी अटक केली. अभिषेक सुरेशकुमार नंदवानी असे या 33 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्यावर पिडीत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन पैशांचा अपहार केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
32 वर्षांची पिडीत तरुणी ही माझगाव परिसरात राहते. गेल्या वर्षी तिची भायखळा येथे राहणार्या अभिषेक नंदवानीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंंबंध निर्माण झाले होते. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. यावेळी त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. जून ते डिसेंबर 2024 या कालावधीत ते दोघेही अनेकदा कांदिवलीतील एका हॉटेलमध्ये भेटले होते. तिथेच त्यांच्यात संमतीने शारीरिक संबंध आले होते. त्यानंतर तो विविध कारण सांगून तिच्याकडून पैशांची मागणी करत होता.
त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याला टप्याटप्याने एक लाख बारा हजार रुपये दिले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याच्या स्वभावात प्रचंड बदल झाला होता. तो तिला प्रतिसाद देत नव्हता. पैशांची मागणी करुनही तो तिचे पैसे परत करत नव्हता. लग्नाच्या आमिषाने त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्याकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन तिची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच तिने कांदिवली पोलिसांनी अभिषेक नंदवानीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.