मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२४
मुंबई, – लग्नाचे आमिष दाखवून एका २८ वर्षांच्या तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिच्याकडून वेळोवेळी घेतलेल्या सुमारे २० लाखांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शोएब इलियाज कुरेशी या आरोपी प्रियकराविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. शोएब हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
२८ वर्षांची पिडीत तरुणी ही कुर्ला येथे तिच्या आई आणि दोन बहिणीसोबत राहते. गेल्या सात वर्षांपासून ती एका सलोनमध्ये कामाला आहे. बारावीमध्ये शिक्षण घेत असताना तिची तिच्याच क्लासमध्ये शिकणार्या शोएब या तरुणाशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. याच दरम्यान त्याने तिला प्रपोज केले होते. गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता. गेल्या दहा वर्षांत त्याने अनेकदा तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध लैगिंक अत्याचार केला होता. २०१९ साली तिच्या कुटुंबियांना नवीन घराचा ताबा मिळाला होता, मात्र ती जुन्याच घरात एकटी राहत होती. यावेळी तो तिथे तिच्यासोबत अधूनमधून राहण्यसाठी येत होता. त्यामुळे त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध येत होते. याच दरम्यान त्याने तिला नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे असे सांगून तिच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यामुळे तिने त्याला ऑनलाईन आणि कॅश स्वरुपात वीस लाख रुपये दिले होते. मात्र या पैशांतून त्याने स्वतचा व्यवसाय सुरु केला नव्हता. डिसेंबर २०२३ रोजी त्याचे एका तरुणीशी लग्न ठरले होते. ही माहिती समजताच तिने शोएबकडे विचारणा केली होती. यावेळी वडिलांच्या आग्रहखातर त्याने लग्नाला होकार दिल्याचे सांगून लग्न तो तिच्याशी करणार असल्याचे सांगितले.
फेब्रुवारी महिन्यांत त्याचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर त्याने तिला भेटून त्यांच्यातील प्रेमसंबंध तोडून तो तिच्याशी लग्न करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले होते. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. दहा वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेल्या शोएबने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता, व्यवसायासाठी वीस लाख रुपये घेऊन तिला ती रक्कम परत केली नव्हती. शोएबकडून फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच तिने त्याच्याविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३१८ (४), ६९ भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच शोएबची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.