अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन खंडणीची मागणी
प्रियकराविरुद्ध लैगिंक अत्याचारासह खंडणीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 मार्च 2025
मुंबई, – शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन प्रेयसीवर लैगिंक अत्याचार करुन तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवून ते फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याच प्रियकराने पन्नास हजाराची खंडणीची मागणी केल्याचा प्रकार जुहू परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकराविरुद्ध जुहू पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह खंडणीसाठी धमकी देणे आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रियकर पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
अठरा वर्षांची पिडीत तरुणी ही अंधेरी परिसरात राहते. तिचा आरोपी मित्र असून त्याने तिला प्रपोज केले होते. त्यावेळेस ती सतरा वर्षांची होती. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत आरोपीने तिला त्याच्या जुहू येथील राहत्या घरी बोलाविले होते. तिथेच त्याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले होते. बेशुद्धावस्थेत असताना त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनविले होते. ते फोटो आणि व्हिडीओ नंतर दाखवून तो तिला सतत ब्लॅकमेल करुन शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करत होता. तिने नकार दिल्यास तिचे फोटो-व्हिडीओ सोशल मिडीयासह तिच्या पालक, मित्रांसह नातेवाईकांना व्हायरल करण्याची धमकी देत होता.
ही धमकी देऊन त्याने तिच्यावर ऑक्टोंबर 2023 ते मार्च 2025 या कालावधीत अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. काही दिवसांनी त्याने तिच्याकडे पन्नास हजाराची मागणी केली होती. मात्र तिने त्याला पैसे देण्यास नकार दिला होता. तरीही तो तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत होता. ती पैसे देण्यास तयार नसल्याने रागाच्या भरात त्याने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ तिच्या बहिणीला पाठवून तिची बदनामीचा प्रयत्न केला होता.
हा प्रकार बहिणीकडून समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने जुहू पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिचा प्रियकराविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादवीसह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.