अश्लील फोटो-व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन खंडणीची मागणी
महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 मार्च 2025
मुंबई, – ज्यूसमधून गुंगीचे औषध देऊन एका 41 वर्षांच्या महिलेवर लैगिंक अत्याचार करुन त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याच मित्राने तिच्याकडे दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. इतकेच नव्हे तर तिच्या मोबाईलवरुन सोशल मिडीयावर अश्लील पोस्ट व्हायरल करुन तिची बदनामी केली. याप्रकरणी अजीत सिंग नावाच्या आरोपी मित्राविरुद्ध ना. म जोशी मार्ग पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह खंडणीसाठी धमकी देणे, बदनामी करणे आदी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. अजीत हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
41 वर्षांची पिडीत महिला ही अॅण्टॉप हिल परिसरात राहते. दोन वर्षांपूर्वी तिची अजीत सिंगशी ओळख झाली होती. अजीत हा नवी मुंबईतील खारघर परिसरात राहतो. काही दिवसांत त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. फेब्रुवारी 2023 रोजी ती त्याच्यासोबत वरळीतील सेनापती बापट मार्ग, लोढा वर्ल्ड वन इमारतीमध्ये आली होती. यावेळी त्याने तिला ज्सूमधून गुंगीचे औषध दिले होते. ते ज्सूस प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली होती. त्याचा गैरफायदा घेऊन त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. यावेळी त्याने त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले होते.
शुद्धीवर आल्यानंतर घडलेला प्रकार समजताच तिने त्याला जाब विचारला होता. यावेळी त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यानंतर त्याने तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ दाखवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. तिच्यावर अनेकदा लैगिंंंक अत्याचार केला होता. तिच्याकडे तो सतत दहा लाखांची मागणी करत होता. पैसे दिले नाहीतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची तसेच तिच्या मुलाला जिवे मारण्याची तो तिला धमकी देत होता. इतकेच नव्हे तर तिच्या मोबाईलवरुन त्याने सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल केली होती. त्यात त्याने ओन्ली व्हिडीओ अॅण्ड फोटो शेअर नो टॉक, ओन्ली मस्ती कॉल गर्ल असा मजकूर अपलोड केला होता.
अशा प्रकारे त्याने तिच्याकडे खंडणीची मागणी करुन तिची सोशल मिडीयावर बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे ती प्रचंड मानसिक नैराश्यात आली होती. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी तिने एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अजीत सिंगविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारसह खंडणीसाठी धमकी देणे, सोशल मिडीयावर बदनामी करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.