विवाहीत महिलेला खंडणीसाठी धमकाविणार्या मित्राला अटक
अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन खंडणीची मागणी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 एपिल 2025
मुंबई, – अंधेरी येथे राहणार्या एका 32 वर्षांच्या विवाहीत महिलेला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी रोहित ऊर्फ रामप्रसाद नारायण पांडे या मित्राला खार पोलिसांनी अटक केली. शारीरिक संबंधाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पिडीत महिलेला ब्लॅकमेल करुन तिच्याकडे दोन लाखांची खंडणीची मागणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. खंडणीसह लैगिंक अत्याचाराच्या याच गुन्ह्यांत रोहितला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार महिला ही अंधेरी परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. याच ठिकाणी रोहित हा कामाला होता. याच दरम्यान त्यांची ओळख झाली. या ओळखीतून त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. काही महिन्यांपूर्वी त्याने तिला खार येथे भेटायला बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेले होते. याच हॉटेलमध्ये त्यांच्यात संमतीने शारीरिक संबंध आले होते. गेल्या काही महिन्यांत त्यांना अनेकदा शारीरिक संबंध आले होते. या शारीरिक संबंधाचे त्याने त्याच्या मोबाईलवरुन अश्लील व्हिडीओ बनविले होते. सर्व काही ठिक सुरु असताना काही दिवसांपासून तो तिला ब्लॅकमेल करत होता. त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे अश्लील व्हिडीओ पाठवून तो तिच्याकडे दोन लाखांची मागणी करत होता.
पैसे दिले नाहीतर तिचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामीची धमकी देत होता. त्याच्याकडून सतत खंडणीसाठी तिला धमकाविले जात होती. त्यामुळे ही महिला काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होती. अखेर तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. घडलेला प्रकार खार पोलिसांना सांगून तिने आरोपी रोहित पांडेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंत त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह खंडणीसाठी धमकी देणे तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच रोहितला विलेपार्ले येथून जुहू पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी खार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर रविवारी दुपारी त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. रोहित हा जुहू येथील ए. बी नायर रोड, जुहू पोस्ट ऑफिसजवळ राहत असून सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. या फोन फॉन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे.