अपहरण केलेल्या तीन महिन्यांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार करुन हत्या
आरोपी तृतीयपंथीला भादवीसह पोक्सोच्या सर्व कलमांतर्गत फाशीची शिक्षा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – मुलगी झाली म्हणून पैशांची मागणी करुनही पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात अपहरण केलेल्या तीन महिन्यांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करुन तिची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट केल्याचा आरोप असलेल्या कन्हैया ऊर्फ कन्नू दत्ता चौगुले या २४ वर्षांच्या तृतीयपंथीला मंगळवारी विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या ए. यू कदम यांनी दोषी ठरवून भादवीसह पोक्सोच्या सर्व कलमार्ंगत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी यासाठी कफ परेड पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले होते.
यातील तक्रारदार कफ परेड परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांना एक मुलगी झाली होती. ही माहिती मिळताच तृतीयपंथी असलेला कन्नू चौगुले हा त्याच्या सहकार्यासोबत त्यांच्या घरी गेला होता. यावेळी त्याने तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. मात्र आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला होता. त्याचा कन्नूच्या मनात प्रचंड राग होता. त्यातून रागाच्या भरात तो ९ जुलैला त्यांच्या घराजवळ आला. कोणीही नसल्याची संधी साधून त्याने त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर त्याने तिची हत्या करुन तिचा मृतदेह समुद्रातील खाडीच्या चिखलात पुरुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
हा प्रकार उघडकीस येताच आरोपी कन्नू चौगुले याच्याविरुद्ध कफ परेड पोलिसंनी ३०२, ३७६ (बी), (डी), ३६३, २०१, ३४ भादवी सहकलम ४, ६, ८, १० पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत कन्नूसह त्याच्या सहकार्याविरुद्ध पोलिसांनी विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. या खटल्याची नियमित सुनावणी न्या. ए. यू कदम यांच्या न्यायालयात सुरु होती. अलीकडेच खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी पोलिसांनी सादर केलेले पुरावे, साक्षीदारांची जबानी तसेच इतर पुराव्याच्या आधारे कन्नू चौगुलेला न्यायालयाने दोषी ठरविले होते. ंमंगळवारी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी याच गुन्ह्यांत त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे.