प्रियकराला वाचविण्यासाठी तरुणीकडून लैगिंक अत्याचाराचा आरोप
अत्याचारासह गर्भवती होण्यास कारणीभूत ठरलेल्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांत प्रियकरावर गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर कारवाई होऊ नये म्हणून एका तरुणीने तिच्या जबानीत तिच्यावर माथेरानमध्ये दोनपैकी एका तरुणांनी लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप करुन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या मैत्रिणीच्या चौकशीतून या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला आणि या तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिला गर्भवती होण्यास कारणीभूत ठरलेल्या प्रियकराविरुद्ध वडाळा टी टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
18 वर्षांची पिडीत मुलगी ही वडाळा परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. ती आठ महिन्यांची गरोदर असल्याने तिला कामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिची डॉक्टरांकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान तिचे वय अठरा असल्याचे उघडकीस आले होते. ती अल्पवयीन असताना तिच्यावर अज्ञात व्यक्तीने लैगिंक अत्याचार केला होता, त्यातून ती गरोदर राहिली होती, त्यामुळे ही माहिती संबंधित डॉक्टरांकडून वडाळा टी टी पोलिसांना देण्यात आली होती.
या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पिडीत मुलीची जबानी नोंदवून घेतली होती. यावेळी तिने पोलिसांना तिच्या प्रेमसंबंधाची माहिती न देता तिच्यावर तिच्याच प्रियकराने लैगिंक अत्याचार केल्याचे सांगितले नाही. प्रियकराला वाचविण्यासाठी तिने पोलिसांना एक काल्पनिक गोष्ट सांगितली होती. ती तिच्या तीन मैत्रिणीसोबत माथेरानला गेली होती. तिथे गेल्यानंतर तिच्यावर एका तरुणाने लैगिंक अत्याचार केला होता. या तरुणाचे वर्णन तिला सांगता येत नव्हते. ती सांगत असलेली माहिती विसंगत वाटत असल्याने या संपूर्ण माहितीची पोलिसांनी शहानिशा सुरु केली होती.
त्याच्याच एक भाग म्हणून तिच्या तिन्ही मैत्रिणीची पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून या तिघींनी जुलै महिन्यांत त्या माथेरानला गेल्याचे सांगून त्यांच्यासोबत पिडीत मुलगी आली नव्हती. हा प्रकार उघडकीस येताच पिडीत तरुणीची पुन्हा पोलिसानी चौकशी सुरु केली होती. या चौकशीदरम्यान तिने तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली देताना त्याच्यासोबत त्याच्या मामाच्या घरी अनेकदा शारीरिक संबंध आल्याचे सांगितले. त्यातून ती गरोदर राहिली होती.
प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल तसेच त्याच्यावर अटकेची कारवाई होऊ नये म्हणून तिने प्रियकराला वाचविण्यासाठी माथेरानची खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध लैगिंक अत्याचार करुन पिडीत मुलीला गर्भवती होण्यास कारणीभूत ठरणे तसेच पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी प्रियकराला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.