बलात्कराच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड ज्युनिअर आर्टिस्टला अटक
दहा महिन्यांपासून सतत पोलिसांना गुंगारा देत होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑगस्ट २०२४
मुंबई, – बलात्काराच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड ज्युनिअर आर्टिस्टला एमआयडीसी पोलिसांच्या विशेष पथकाने मार्वे परिसरातून अटक केली. योगेशकुमार सिंग असे या २९ वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच तो गेल्या दहा महिन्यांपासून सतत पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या अटकेसाठी एमआयडीसी पोलिसांचे विशेष पथक दोन वेळा बिहारला गेले होते, मात्र पोलीस पोहचण्यापूर्वीच तो तेथूनही पळून गेल्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंदराव काशिद यांनी सांगितले.
योगेश हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून सध्या मालाडच्या मार्वे, मढजेट्टी, पास्कलवाडीत होता. तो सिनेसृष्टीशी संबंधित असून ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करत होता. याच दरम्यान त्याची याच क्षेत्राशी संबंधित एका तरुणीशी ओळख झाली होती. या दोघांचे प्रेमसंबंध झाले आणि त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला. मात्र तिच्याशी लग्न न करता तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर योगेशविरुद्ध पोलिसांनी ३७६, ३७६ (२), (एन), ४१७ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांना तपास करुन आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड, पोलीस निरीक्षक तुकाराम कोयंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदराव काशिद,पोलीस शिपाई जाधवच, अवघडे, लोखंडे आणि शिंदे यांनी आरोपीचा शोध सुरु केला होता.
योगेश हा मूळचा बिहारचा होता. त्यामुळे तो बिहारला पळून गेल्याची शक्यता होती, त्याच्या अटकेसाठी दोन वेळा संबंधित पथक बिहारला गेले होते, मात्र तो तेथूनही निसटला होता. तरीही त्याचा पोलिसांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना योगेशचा मोबाईल लोकेशन मालाडच्या मढ-मार्वे परिसरात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आनंदराव काशिद व अन्य पोलीस पथकाने मार्वे परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून योगेश सिंगला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने पिडीत महिलेवर बलात्कार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक करुन लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांतील आरोपीची माहिती सलग दहा महिने माहिती त्याला मार्वे परिसरातून अटक करणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड, पोलीस निरीक्षक तुकाराम कोयंडे, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव काशिद,पोलीस शिपाई जाधवच, अवघडे, लोखंडे आणि शिंदे यांचा वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले होते.