पतीविरोधातील तक्रारीबाबत रश्मी करंदीकर यांची चौकशी

विविध शासकीय कामाच्या आमिषाने अनेकांना गंडा घातला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 मार्च 2025
मुंबई, – विविध शासकीय कामाच्या आमिषाने दोन व्यावसायिकाची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचा कटाचा मुख्य आरोपी पुरुषोत्तम प्रभाकर चव्हाण याची पत्नी आणि आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांची सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी सव्वातास चौकशी केली होती. पुरुषोत्तम व त्याचे दोन सहकारी नारायण सावंत आणि यशवंत पवार यांनी शासकीय कोट्यातील भूखंड-सदनिका, पुणे-ठाणे महानगरपालिकेचे डेव्हल्पेमेंट सर्टिफिकेटस, नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये टी-शर्ट आणि हुडी पुरविण्याचे बोगस कंत्राटाचे दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन दोन व्यावसायिकाची फसवणुक केल्याचा आरोप असून याच गुन्ह्यांत या तिघांविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत दोन स्वतंत्र फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांबाबत रश्मी करंदीकर यांची चौकशी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुरुषोत्तम चव्हाण हा आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचा पती आहे. यापूर्वी त्याला 263 कोटीच्या टीडीएस घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध अनेक व्यावसायिकांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. अनेकांना ही टोळी शासकीय कोट्यातून कमी किंमतीत भूखंड तसेच सदनिका देण्याचे आश्वासन दिले होते. पुणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या डेव्हल्पमेंट राईट सर्टिफिकेट तसेच नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये टी शर्ट आणि हुडी पुरविण्याचे कंत्राट मिळवून देतो असे सांगत होते. त्यासाठी त्यांच्याकडून त्यांनी कोट्यवधी रुपये घेतले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित तक्रारदार व्यावसायिकांनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर जानेवारी महिन्यांत पुरुषोत्तम चव्हाणसह नारायण सावंत आणि यशवंत पवार या तिघांविरुद्ध दोन फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते.

या दोन्ही गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. याच गुन्ह्यांत रश्मी करंदीकर यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविण्यात आले होते. या समन्सनंतर सोमवारी सायंकाळी सात वाजता रश्मी करंदीकर या त्यांचे वकिल वैभव बगाडे यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांच्या पतीविरोधात दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यांबाबत त्यांची पोलिसांनी चौकशी केली. यावेळी रश्मी करंदीकर यांनी त्यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची माहिती घेऊन पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आश्वासन दिले. सुमारे सव्वातास ही चौकशी सुरु होती. मात्र त्यांची जबानी नोंदविण्यात आली नव्हती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page