अकरा हजाराची लाच घेताना जिल्हा पुरवठा अधिकार्याला अटक
नेगीटिव्ह अहवाल न पाठविण्यासाठी लाचेची मागणी करणे महागात पडली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2025
मुंबई, – रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा अधिकारी प्रदीप प्रितम केदार यांना शुक्रवारी अकरा हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना रत्नागिरी युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. नेगीटिव्ह अहवाल न पाठविण्यासाठी लाचेची मागणी करणे प्रदीप केदार यांना चांगलेच महागात पडले. त्यांना त्यांच्या कार्यालयातच लाच घेताना अटक झाल्याने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
यातील 50 वर्षांचे तक्रारदार संगमेश्वर येथे पुरवठा निरीक्षक म्हणून काम करतात. 22 मार्चला जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप केदार त्यांच्या अखत्यारीत येणार्या रत्नागिरीच्या माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळेस तक्रारदार गैरहजर होते. यावेळी त्यांनी त्यांच्या अखत्यारीतील गोदामाची तपासणी करुन धान्य साठ्याची पाहणी केली होती. या पाहणीत धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याचे दिसून आले. याबाबतचा अहवाल तसेच ते गैरहजर असल्याने त्यांच्याविरुद्ध नेगीटिव्ह अहवाल सादर करण्यात येणार होता. हा अहवाल न पाठविण्यासाठी प्रदीप केदार यांनी त्यांच्याकडे पंधरा हजाराच्या लाचेची मागणी केली होती.
मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्यांना अकरा हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांनी प्रदीप केदार यांच्याविरुद्ध रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी प्रदीप केदार यांनी पंधरा हजाराची लाचेची मागणी करुन अकरा हजाराची लाच घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर या अधिकार्यांनी शुक्रवारी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावला होता.
यावेळी प्रदीप केदार यांना तक्रारदाराकडून अकरा हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सुहास शिंदे, संजय गोविलकर, पोलीस उपअधिक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहाय्यक फौजदार चांदणे, पोलीस हवालदार दिपक आंबेकर, संजय वाघाटे, विशाल नलावडे, अंमलदार राजेश गावकर यांनी केली.