जोगेश्वरीतील भूखंड घोटाळाप्रकरणी रविंद्र वायकर यांना क्लिनचिट
महानगरपालिकेकडून गैरसमजुतीतून तक्रार केल्याचे रिपोर्टमध्ये नमूद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ जुलै २०२४
मुंबई, – उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामिल होताच खासदार रविंद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी जोगेश्वरीतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातून क्लिनचिट दिल्याने राजकीय वर्तुळात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महानगरपालिकेकडून रविंद्र वायकर यांच्या विरोधात गैरसमजुतीतून तक्रार करण्यात आल्याचा एक अहवाल मनपाने मुंबई पोलिसांना सादर केला होता. त्यामुळे रविंद्र वायकर यांच्याविरुद्ध गुन्हा घेत मुंबई पोलिसांनी या गुन्ह्यांत त्यांना क्लिन चिट दिल्याचे सांगण्यात आले.
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविंद्र वायकर यांच्याविरुद्ध जोगेश्वरीतील कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळा केल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. महाविकास आघाडीच्या काळात सार्वजनिक वापरारासाठी राखीव असलेला हा भूखंड रविंद्र वायकर यांनी एक फाईव्ह स्टार बांधण्यासाठी दिला होता. या संपूर्ण प्रकरणात पाचशे कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप करुन किरीट सोमय्या यांनी रविंद्र वायकर यांच्यविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. या आरोपानंतर रविंद्र वायकर यांच्यासह त्यांची पत्नी मनिषा वायकर, आर्किटेक्ट अरुण दुबे, आसू नेहमाली, प्रिथपाल बिंद्रा, राज लालचंदानी यांच्याविरुद्ध मनपाचे अभियंता संतोष मांडवकर यांनी आझाद मैदान पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. याच दरम्यान रविंद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना वायव्य मुंबईतून लोकसभेची तिकिट देण्यात आली होती. या निवडणुकीत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला होता.
आमदार असलेले रविंद्र वायकर हे आता खासदार आहेत. त्यातच जोगेश्वरीतील भूखंड घोटाळ्यातून रविंद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे. त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत सहआरोपी असलेले सर्व आरोपींना आता क्लिनचिट मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी स्थानिक न्यायालयात आपला क्लोजर रिपोर्ट सादर करताना महानगरपालिकेच्या गैरसमजुतीतून हा गुन्हा केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे ठपका ठेवणार्या मनपा अधिकार्यांवर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे शिंदे गटात सामिल होताच रविंद्र वायकर यांना क्लिनचिट मिळाल्याने आगाामी काळात राजकीय वातावरण चांगले तापणार असल्याचे बोलले जाते.