रिझर्व्ह बँकेत घातपात घडविण्याची धमकी
लष्कर-ए-तोयबाचा सीईओ असल्याचा दावा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) – दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील रिझर्व्ह बँकेत घातपात घडविण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणार्या व्यक्ती तो पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तोयबाचा सीईओ असल्याचा दावा केला आहे. बँक बंद करा नाहीतर कारने धडक देऊ असा कॉल व्यक्तीने दिल्याने रिझर्व्ह बँकेतील सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सार्वजनिक शांततेचा भंग करणारी विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सचिन शिवाजी गोसावी हे नवी मुंबईतील सानपाडा परिसरात राहतात. ते सध्या फोर्ट येथील शहीद भगतसिंग रोडवर असलेल्या जुनी भारतीय रिझर्व्ह बँकेत सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. शनिवारी सकाळी अकरा वाजता बँकेच्या कस्टमर केअरला एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. या व्यक्तीने तो लष्कर-ए-तोयबाचा सीईओ बोलत असल्याचे सांगितले. ही बँक तातडीने बंद करा नाहीतर कारने धडक देऊ अशी धमकी देऊन त्याने कॉल कट केला होता. या घटनेनंतर रिझर्व्ह बँकेच्या वतीने सचिन गोसावी यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर धमकी देणार्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी ३५३ (१), (इ), ३५३ (२), ३५१ (३), ३५१ (४) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक पोलिसांना देण्यात आला आहे. या मोबाईल क्रमाकांची माहितीसह सीडीआर काढली जात आहे. लवकरच या व्यक्तीला अटक करण्यात पोलिसांना यश येईल. या गुन्ह्यांत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत आहे.