मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 एप्रिल 2025
मुंबई, – उत्तरप्रदेशातून आणलेल्या घातक शस्त्रांसह अंगतसिंह श्रीरामगोपाल जाधव या 29 वर्षांच्या तरुणाला आरसीएफ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी देशी बनावटीचे दोन पिस्तूल, आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या शस्त्रांची तो मुंबई शहरात विक्री करणार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काहीजण घातक शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे यांना मिळाली होती. या माहितीनंतर अंमली पदार्थ विरोधी पथकासह एटीएसच्या अधिकार्यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता चेंबूर येथील माहुल रोड, जिजामाता जंक्शन परिसरात अंगतसिंह जाधव हा आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पळून जाणयाची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केले. तपासात अंगतसिंग हा उत्तरप्रदेशच्या इटावा, शिरसा, रुटोली गावचा रहिवाशी असून तिथेच त्याची स्वतची शेती आहे.
मुंबई शहरात घातक शस्त्रे विक्रीसाठी तो देशी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे घेऊन आला होता. मात्र या शस्त्रांची विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला ते शस्त्रे कोणी दिले, तो शस्त्रे कोणाला देणार होता, त्याने यापूर्वीही शस्त्रांची विक्री केली का, या शस्त्रांचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला का, या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा आता पोलीस तपास करत आहेत.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश बाबूशेट्टी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार गाठे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे, पोलीस शिपाई केदार, राऊत, साळवे, सानप, आरसीएफ पोलीस ठाण्याच्या एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाणी, पोलीस हवालदार खैरे, येळे यांनी केली.