भांडण सोडविणार्या पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की
चेंबूर येथील घटना; तिघांविरुद्ध गुन्हा तर एका आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणार्या पोलीस पथकाला सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत संजय प्रकाश राठोड या २९ वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली तर त्याचे दोन सहकारी रोहित मनोहर चित्ते आणि गणेश हरिभाऊ इंगळे हे दोघेजण पळून गेले. ते तिघेही चेंबूरचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गणपत बळवंत धुमाळ हे नवी मुंबईतील कामोठे परिसरात राहत असून आरसीएफ पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री उशिरा आरसीएफ पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी चेंबूर येथील चेंबूर कॅम्प, संजय रेस्ट्रारंटजवळ तीन तरुण आश्विन यशोधरन या तरुणाला शिवीगाळ करुन मारहाण करत होते. हा प्रकार निदर्शनास येताच गणपत धुमाळ, सहाय्यक फौजदार वाणी आणि अतुल गायकवाड यांनी त्यांच्यातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा राग आल्याने त्यांनी पोलीस पथकालाच शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली. त्यांच हातातील मुठी जोरात आवळून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर संजय राठोडला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले तर इतर दोघेही अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलीस ठाण्यता आणल्यानंतर संजयसह पळून गेलेल्या रोहित आणि गणेश या तिघांविरुद्ध पोलिसांनी १३२, २२१, ३५२, ३५१ (२), ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच संजय राठोडला पोलिसांनी अटक केली तर दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.