मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ जानेवारी २०२४
मुंबई, – चेंबूरच्या आपला दवाखान्यात महिला कर्मचार्यांना शिवीगाळ करुन गोंधळ घालून कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गणेश बब्रुवान कांबळे या ४० वर्षांच्या रेकॉर्डवरील आरोपीस आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध शासकीय कर्मचार्यासह पोलिसांना शिवीगाळ करुन मारहाण करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
विक्रांत राजेंद्र भावसार हे मुलुंड पोलीस वसाहत राहत असून सध्या आरसीएफ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ते त्यांचे सहकारी पोलीस शिपाई घाडगे यांच्यासोबत परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना चेंबूर येथील वाशीनाका, नारायण आचार्य भारतनगर येथील आपला दवाखान्यात महिला कर्मचार्यांना एक व्यक्ती शिवीगाळ करुन तिथे गोंधळ घालत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर ते घाडगे यांच्यासोबत आपला दवाखाना येथे आले होते. तिथे आल्यानंतर त्यांना गणेश कांबळे हा गोंधळ घालून महिला कर्मचार्यांना शिवीगाळ करताना दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्याला शांत राहण्यास सांगितले.
मात्र पोलिसांना पाहताच त्याने त्यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. वारंवार समजूत घालूनही तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता यावेळी त्याने विक्रांत भावसार यांची कॉलर करुन त्यांना मारहाण केली. तू आधी माझ्या गुन्ह्यांचा रेकॉर्ड बघ, माझ्याशी कोणीही पंगा घेत नाही. आज ना उद्या तुझा गेम करतोच, तुला आता जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. या घटनेने तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तिथे आरसीएफ पोलिसांचे एक पथक आले होते. या पथकाने त्याला बळाचा वापर करुन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
चौकशीत तो गणेश कांबळे असल्याचे उघडकीस आले. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मारामारीसह गंभीर दुखापत करुन रॉबरी करणे, खंडणीसाठी धमकी दिल्याचे सातहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याविरुद्ध विक्रांत भावसार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.