मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ डिसेंबर २०२४
मुंबई, – आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे २४ कोटी रुपये किंमत असलेल्या सोळा किलो एमडी ड्रग्जसहीत पाचजणांच्या एका टोळीला महसूल गुप्तवार्ता संचलनालयाच्या अधिकार्यांनी अटक केली. या आरोपींकडून ड्रग्जसहीत १ कोटी ९३ लाख रुपयांची कॅशही हस्तगत करण्यात या अधिकार्यांना यश आले आहे. प्राथमिक तपासात एमडी ड्रग्जचा हा साठा हैद्राबाद येथून आणण्यात आला होता. मुंबईत या ड्रग्जची काही तस्कराच्या मदतीने विक्री होणार होती, मात्र त्यापूर्वीच डीआरआयच्या अधिकार्यांनी या टोळीचा पर्दाफाश करुन ड्रग्जसहीत कॅश जप्त केली आहे.
गेल्या काही वर्षांत एमडी ड्रग्जच्या मागणीला प्रचंड मागणी आली आहे. इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज आणले जात असल्याने अशा तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणेने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना हैद्राबाद येथून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जचा साठा खाजगी बसच्या माध्यमातून येणार असल्याची माहिती मुंबई युनिटच्या डीआरआयच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या अधिकार्यांनी मुंबई येणार्या खाजगी बसवर लक्ष केंद्रीत केले होते. अशाच एका खाजगी बसचा पाठलाग करुन मुंबईत आलेल्या दोन प्रवाशांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्यांना सोळा किलो एमडी ड्रग्जचा साठा सापडला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत २४ कोटी रुपये आहे. तपासात त्यांनी ते ड्रग्ज एका मध्यस्थासह रिसीव्हर्सना देण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या इतर सहकार्यांचा या अधिकार्यांनी शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना एमडी ड्रग्ज घेण्यासाठी आलेल्या तिघांनाही या अधिकार्यांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी १ कोटी ९३ लाख रुपयांची कॅश जप्त केली. या पाचही आरोपीविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करुन त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चौकशीत एमडी ड्रग्ज तस्करी करणारी ही आंतरराज्य टोळी आहे. या पाचजणांच्या अटकेने त्यांच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.