रिलायन्स स्मार्ट बाजारच्या मालाची परस्पर विक्री करुन फसवणक
1 कोटी 19 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2025
मुंबई, – घाटकोपर परिसरातील रिलायन्स स्मार्ट बाजारच्या स्टोरमधील एक कोटी एकोणीस लाख रुपयांच्या मालाची परस्पर विक्री करुन कंपनीच्या चार अधिकार्यांनी फसवणुक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित चारही अधिकार्याविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्टोर मॅनेजर शैलेश सिंग, सहाय्यक स्टोर मॅनेजर तेजस कोरान्ने, कमर्शियल कॅशिअर जगन्नाथ साहू आणि गोदाम इन्चार्ज सज्जाद सिद्धीकी अशी या चौघांची नावे असून या चौघांची लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
दिलीप सिद्धू साळुंखे हे पनवेलच्या डेरवली, राज अपार्टमेंटमध्ये राहतात. घाटकोपर येथे फिनिक्स मार्केट सिटीमध्ये रिलायन्स स्मार्ट बाजार नावाचे बिग शॉप असून तिथे दिलीप साळुंखे हे स्टोर मॅनेजर म्हणून कामाला आहेत. याच ठिकाणी शैलेश सिंग स्टोर मॅनेजर, तेजस कोरान्ने सहाय्यक स्टोर मॅनेजर, जगन्नाथ साहू हा कमर्शियल कॅशिअर तर सज्जाद सिद्धीकी हा गोदाम इन्चार्ज म्हणून काम करत होते. या चौघांवर विश्वास ठेवून कंपनीने स्मार्ट बाजारच्या स्टोरमध्ये 1 कोटी 19 लाख 38 हजार 315 रुपयांचा माल सोपविला होता. मात्र या चौघांनी कंपनीला कोणतीही माहिती न देता या मालाची परस्पर बाहेर विक्री केली होती. त्यातून आलेले पैसे आपसांत वाटून घेतले आणि कंपनीत आर्थिक घोटाळा केला होता.
हा संपूर्ण घोटाळा 13 जुलै 2023 ते 25 सप्टेंबर 2024 या कालावधीत झाला होता. हा प्रकार नंतर वरिष्ठ अधिकार्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश दिलीप साळुंखे यांना दिली होती. या चौकशीदरम्यान चार चौघांनी संगनमत करुन कंपनीच्या मालाची परस्पर बाहेर विक्री करुन त्यातून मिळालेल्या पैशांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच या चौघांनाही कामावरुन निलंबित करण्यात आले होते.
याप्रकरणी कंपनीच्या वतीने दिलीप साळुंखे यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शैलेश सिंग, तेजस कोरान्ने, जगन्नाथ साहू आणि सज्जाद सिद्धीकी या चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या चौघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.