मेल-एक्स्रपेसमध्ये चोरी करणार्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
22 लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक तर सोळा गुन्ह्यांची उकल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 सप्टेंबर 2025
ठाणे, – मेल-एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या मौल्यवान सोन्याच्या दागिन्यांसह कॅश आणि सामानाची चोरी करणार्या एका आंतरराज्य टोळीचा रेल्वेच्या गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली. वकार आलम तौकिर खान आणि जुगलकिशोर ओमप्रकाश विश्वकर्मा अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे उत्तरप्रदेशच्या कानपूर आणि गांझीपूरचे रहिवाशी आहे. या दोघांच्या अटकेने कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील आठ, ठाणे चार, कर्जत तीन, डोबिंवली एक अशा सोळा चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. या गुन्ह्यांतील 315 ग्रॅम वजनाचे सोने आणि 72 हजार रुपयांची कॅश असा 22 लाख 24 हजार 769 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांनी सांगितले. अटकेनंतर दोन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांत लांबपल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्यामध्ये प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांसह कॅश आणि इतर मौल्यवान सामानाच्या चोरीच्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. याबाबत ठाणे, कल्याण, डोबिवली आणि कर्जत पोलीस ठाण्यात अनेक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. या चोरीच्या तक्रारीची पोलीस आयुक्त एम. के कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी गंभीर दखल घेत या आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेसह सायबर सेलची एक विशेष टिमची नियुक्ती केली होती. या टिमला संबंधित आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश देण्यात आले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश खाडे, देवीदास अरण्ये, दिपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर सावंत, पोलीस अंमलदार संदीप गायकवाड, राम जाधव, स्मिता वसावे, लक्ष्मण बळकुंडे, प्रमोद दिघे, रविंद्र ठाकूर, अक्षय चव्हाण, गणेश महागांवकर, रुपेश निकम, सुनिल मागाडे, स्वप्नील नांगरे, विक्रम चावरेकर, संदेश कोंडाळकर, अविनाश पाटील, पोलीस शिपाई अमोल अहिनवे, अनिल राठोड यांनी तपास सुरु केला होता.
रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. गुन्ह्यांची पद्धत आणि वेळेचा अभ्यास करुन पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकात चोरीच्या उद्देशाने आलेल्या वकाल खान आणि जुगलकिशोर विश्वकर्मा या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत ते दोघेही मूळचे उत्तरप्रदेशच्या गांझीपूर आणि कानपूरचे रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. त्यांनी मेल-एक्सप्रेसमध्ये चोरीची कबुली देताना गेल्या काही महिन्यांत विविध रेल्वे पोलीस ठाण्यात प्रवाशांचे सोन्याचे दागिने, कॅश आणि इतर सामानाची चोरी केल्याचे सांगितले.
त्यांच्या अटकेने कर्जत, ठाणे, कल्याण आणि डोबिवली रेल्वे पोलीस ठाण्यातील सोळा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. चोरीनंतर ही टोळी उत्तरप्रदेशला पळून जात होती. त्यामुळे या टोळीला आतापर्यंत पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आले नव्हते. पहिल्यांदाच या टोळीतील दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्या चौकशीत त्यांच्या इतर दोन सहकार्यांची नावे समोर आली आहे. या दोघांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
एक्सप्रेस-मेलमध्ये प्रवाशांच्या सामानावर हातसफाई करणारी ही आंतरराज्य टोळीने असून या टोळीने महाराष्ट्रातील अनेक रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचे बोलले जाते. या आरोपींकडून चोरीचे सोने आणि कॅश असा सुमारे 22 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कुठलाही पुरावा नसताना मेल-एक्सप्रेममध्ये चोरी करणार्या दोन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीचा 22 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करुन सोळा गुन्ह्यांची उकल करणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस निरीक्षक रोहित सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश खाडे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचार्याचे पोलीस आयुक्त एम. के कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी कौतुक केले आहे.