मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – लोकलमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेचा विनयभंग करणार्या आरोपीस रेल्वे गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. पंकज ढोलकिया असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा गुजरातच्या सुरतचा रहिवाशी आहे. अटकेच्या भीतीने तो मुंबईहून सुरतला पळून गेला होता, काही दिवस त्याने वेशांतर केल्याचेही तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
ऑगस्ट महिन्यांत लोकलमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग केला होता. या घटनेनंतर या महिलेने अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच रेल्वे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटविण्याचे काम सुरु होते. या फुटेजसह तांत्रिक माहितीनंतर गुन्हे शाखेचे एक पथक सुरतला गेले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने पंकज ढोलकिया या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने तक्रारदार महिलेचा विनयभंग केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. त्याचा ताबा अंधेरी रेल्वे पोलिसांकडे सोपविण्यात आला होता.
तपासात ढोलकीया हा मूळचा सुरतचा रहिवाशी असून तो पूर्वी मुंबईतील एका खाजगी कंपनीत सेल्समन म्हणून कामाला होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याने नोकरी सोडली होती. ऑगस्ट महिन्यांत तो गोरेगाव येथील एका प्रदर्शनासाठी आली होती. तेथून तो राममंदिर रेल्वे स्थानकात आला. यावेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेऊन त्याने तक्रारदार महिलेचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर तो सुरतला पळून गेला होता. अटकेच्या भितीने त्याला काही दिवस वेशांतर केले होते.