टिसी पदासाठी आठ तरुणांकडून घेतलेल्या ७२ लाखांचा अपहार
नऊ महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ जुलै २०२४
मुंबई, – रेल्वेत तिकिट तपासणीस पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून आठ तरुणांकडून घेतलेल्या सुमारे ७२ लाखांचा अपहार करुन पळून गेलेल्या एका मुख्य आरोपीस पवई पोलिसांनी अटक केली. कलीम हसन नुरुल हसन शेख असे या आरोपीचे नाव असून गुन्हा घडल्यानंतर तो पळून गेला होता. अखेर नऊ महिन्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुशील रतन बारोटे हा मूळचा जालनाचा रहिवाशी असून तिथे त्याची ओम साई मल्टिसर्व्हिसेस नावाचे महा ई सेवा केंद्र आहे. २००९ साली त्याला त्याच्या मित्राने कलीमविषयी माहिती दिली होती. त्याची रेल्वेमध्ये चांगली ओळख आहे. तो अनेकांना रेल्वेत तिकिट तपासणीस म्हणून नोकरी मिळवून देतो असे सांगितले होते. त्यामुळे त्याने त्याच्या भावासह इतर नातेवाईकांसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. जानेवारी २०१९ रोजी सुशील हा महादूसोबत मुंबईत आला होता. त्यानंतर ते दोघेही कलीमच्या पवईतील हिरानंदानी, पवई प्लाझामधये असलेल्या कार्यालयात गेले होते. तिथे कलीमची भेट घेतल्यानंतर सुशीलने त्याच्या भावासह नातेवाईकासाठी नोकरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. यावेळी कलीमने प्रत्येक उमेदवारामागे तो सहा लाख रुपये घेत असल्याचे सांगितले. त्याने सहा लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर सुशीलने जून २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत रेल्वेतील नोकरीसाठी कलीमच्या कंपनीच्या बँक खात्यात ३७ लाख ९० हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम पाठविल्यानंतर कलीमने विशाल बोरोटे, गणेश बोरोटे, निवृत्ती बोरोटे, अमोल नेवरे, भागवत खडके, संतोष कड यांची झारखंड राज्यातील टिसी पदासाठी रेल्वे बोर्डाचे बोगस पेपर्स तयार करुन स्कॅन करुन ऑर्डर कॉपी २१ मार्च २०२१ रोजी काढले होते.
ही ऑर्डर कॉपी प्राप्त होताच संबंधित सहाजण झारखंडला गेले होते. तिथे त्यांची आदित्य सिंग या रेल्वे अधिकार्यांशी ओळख करुन देण्यात आली. त्याने त्यांना झारखंडच्या हटिया रेल्वे स्थानकात २७ मार्च २०२१ पासून नोकरीवर हजर राहण्यास सांगितले. त्यामुळे ते सहाजण नोकरीसाठी हजर झाले होते. पंधरा दिवसानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले होते. त्यामुळे आदित्यसिंगने त्यांना त्यांच्या घरी जाण्यास सांगितले. कोरोना संपल्यानंतर त्यांना पुन्हा नोकरीवर बोलाविले जाईल असे सांगितले. त्यानंतर सुशीलने त्याच्या अन्य नातेवाईकांना टिसी पदासाठी नोकरी मिळवून देण्यासाठी कलीमला सतरा लाख रुपये पाठवून दिले होते. यावेळी कलीमने पुन्हा त्यांच्या नावाने झारखंड राज्यातील टिसी पदाच्या नोकरीचे नियुक्तीपत्र काढले होते. तिथे हजर झाल्यानंतर या नातेवाईकांना पुन्हा त्यांच्या घरी पाठविण्यात आले होते. या सर्वांना नोकरी देण्यासाठी जास्त पैसे खर्च झाल्याचे सांगून कलीमने सुशीलकडे आणखीन पैशांची मागणी केली होती. त्यामुळे सुशीलने त्याला पुन्हा १७ लाख ६२ हजार रुपये पाठवून दिले होते. डिसेंबर २०२२ रोजी त्यापैकी चौघांची उत्तरप्रदेशात बदली दाखविण्यात आली होती. त्यामुळे विशाल, निवृत्ती, गणेश आणि विशाल साळवे हे उत्तरप्रदेशात गेले होते. मात्र तिथे त्यांना नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले नव्हते.
काही दिवस तिथे राहिल्यानंतर ते चौघेही पुन्हा त्यांच्या घरी निघून आले. त्यामुळे सुशीलने त्याला संपर्क साधून याबाबत विचारणा केली होती. मात्र तो विविध कारण सांगून त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होता. एक वर्ष उलटूनही त्याने आठपैकी कोणालाही नोकरीसाठी रुजू करुन घेतले नाही. जून २०२० ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत रेल्वेत टिसी पदासाठी नोकरीसाठी सुशील बोरोटे याने कलीमने त्याच्या भावासह सात नातेवाईकांसाठी ७२ लाख ५० हजार रुपये दिले होते. मात्र बोगस नियुक्तीपत्र पाठवून त्याने त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने पवई पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कलीम शेखविरुद्ध ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना नऊ महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या कलीम शेखला शनिवारी पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने या आठही तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.