मध्य रेल्वेत क्लार्कसाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणुक
पंधरा लाखांचा अपहारप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ मार्च २०२४
मुंबई, – मध्य रेल्वेमध्ये क्लार्क पदासाठी हमखास नोकरी मिळवून देतो असे सांगून एका व्यक्तीची पाचजणांच्या टोळीने सुमारे पंधरा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आला आहे. दिलेल्या मुदतीत नोकरी मिळवनू दिली नाही म्हणून विचारणा केल्यानंतर या टोळीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना रेल्वे मंत्रीपदावरुन काढून टाकल्याने आता काहीच होणार नाही असे सांगून नोकरीसाठी दिलेल्या पैशांचा अपहार केला. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी पाचही आरोपीविरुद्ध रेल्वेचे बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. सचिन चिखलकर, संजय कोळी, रेश्मा सचिन चिखलकर, रामचंद्र पाटील आणि प्रकाश चव्हाण अशी या पाचजणांची नावे असून ते सर्वजण विक्रोळीतील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पळून गेलेल्या या पाचही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
४० वर्षांचे तक्रारदार विक्रोळीतील टागोरनगर परिसरात राहतात. याच परिसरात संजय कोळी हा राहत असून त्याने त्यांना मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी असल्याचे सांगितले होते. त्याच्या परिचित निलम गोरे आणि सचिव सचिन चिखलकर यांच्या मदतीने त्यांना मंत्रालयीन कोट्यातून नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. संजय हा त्यांच्या परिचित असल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नोकरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने क्लार्क पदासाठी किमान २५ तर टिसी पदासाठी ४० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी क्लार्क पदासाठी २५ लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. याच दरम्यान त्याने त्यांची ओळख सचिन चिखलकर, प्रकाश चव्हाण आणि रामचंद्र पाटीलल यांच्याशी करुन दिली होती. ते सर्वजण रेल्वेमध्ये नोकरीसाठी त्यांना मदत करत असल्याचे सांगितले. सध्या सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहेत. त्यामुळे तातडीने काही रक्कम भरुन आपली सीट आधीच बुक करा असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना टप्याटप्याने पंधरा लाख वीस हजार रुपये घेतले होते. पत्नीचे शैक्षणिक कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांनी तिच्या नावाने अर्ज भरला होता. ऑगस्ट २०१८ रोजी त्यांच्या व्हॉटअपवर रेल्वे रिक्रुरटमेंट बोर्डाचे परिक्षेचे हॉल तिकिट पाठविले होते. त्यामुळे ते त्यांची पत्नीसोबत २३ ऑगस्टला परिक्षा देण्यासाठी भुसावळ येथे गेले होते. परिक्षेच्या वेळेस तिला ममता सावंत आणि वनिता चव्हाण हे मदत करतील असे सांगण्यात आले होते. यावेळी तिथे सचिन स्वत उपस्थित होता.
मात्र कोव्हीडमध्ये तिला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले नाही. त्यानंतर ते सर्वजण त्यांना टाळाटाळ करत होते. काही दिवसांनी त्यांनी पियुष गोयल यांच्याकडून रेल्वे खाते काढून घेण्यात आल्याने आता काहीच होऊ शकणार नाही असे सांगितले. अशा प्रकारे त्यांनी दिलेल्या मुदतीत रेल्वेमध्ये नोकरी मिळवून दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे नोकरीसाठी घेतलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र पैसे परत न करता त्यांनी त्यांची फसवणुक केली होती. या घटनेनंतर त्यांनी विक्रोळी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित पाचही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सचिन चिखलकर, संजय कोळी, रेश्मा सचिन चिखलकर, रामचंद्र पाटील आणि प्रकाश चव्हाण यांच्याविरुद्ध पोलिसांनी रेल्वेचे बोगस दस्तावेज बनवून नोकरीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या टोळीने अशाच प्रकारे इतर काहींना मध्य रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.