रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने वकिलासह पाचजणांची फसवणुक
३६ लाखांना गंडा घालणार्या आरोपीस अटक; नऊ गुन्ह्यांची उकल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मार्च २०२४
मुंबई, – रेल्वेत विविध पदावर नोकरी भरती सुरु असल्याची बतावणी करुन एका वकिलासह पाचजणांची सुमारे ३६ लाखांची फसवणुक केल्याच्या कटातील एका मुख्य आरोपीस सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. कैलास राजपाल सिंग असे या आरोपीचे नाव असून तो अशाच गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात नऊहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत मोहम्मद दानिश जिशान आलम आणि राहुल सिंग ऊर्फ कुंदनकुमार राम हे दोघेही सहआरोपी असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तिन्ही आरोपी मूळचे बिहारचे रहिवाशी असून फसवणुक करणारी ही एक बिहारी टोळी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
३८ वर्षांचे तक्रारदार धनराज पुंडलिक कांबळे हे व्यवसायाने वकिल असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वरळी येथे राहतात. सध्या ते सत्र न्यायालयात वकिल म्हणून काम करतात. त्यांचा डी. बी मार्ग पोलीस वसाहतीत राहणारा पोलीस मित्राने त्यांना मोहम्मद दानिशची माहिती दिली होती. तो बिहारच्या पटना शहरात राहत असून त्याची रेल्वेमध्ये चांगली ओळख आहे. या ओळखीतून त्याने आतापर्यंत अनेकांना नोकरी मिळवून दिली आहे. या पोलीस मित्राने त्याच्या दोन्ही मुलींना रेल्वेत नोकरीसाठी त्याला सांगितले असून तो त्यांच्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तक्रारदाराने त्याच्या भावाच्या नोकरीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांची सांताक्रुज येथील जुहू-तारा रोडवरील हॉटेल सी प्रिसेंसमध्ये भेट झाली होती. यावेळी मोहम्मद दानिशसोबत त्याचे दोन मित्र राहुल सिंग आणि कैलास सिंग उपस्थित होते. या भेटीत त्याने तो रेल्वेमध्ये सहाय्यक पर्सनल अधिकारी, राहुल हा हेड क्लार्क तर कैलास सहाय्यक म्हणून काम करतो असे सांगितले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांचे ओळखपत्र दाखविले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. मोहम्मद दागिशने त्याला सहा महिन्यांत रेल्वेमध्ये भरती करण्याचे आश्वासन देत त्यांना भरतीची संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली होती. कोलकाता येथे मेडीकल झाल्यानंतर रिपोटींग करुन व्हेरीफिकेशन होईल आणि नंतर तीन महिन्यांत रेल्वेत रुजू होईल. रुजू झाल्यानंतर काही दिवसांत मुंबईत पोस्टिंग करुन देतो असेही सांगितले होते. यावेळी तक्रारदाराने त्यांच्या भावाला शिपाई पदासाठी नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी दहा लाख खर्च अपेक्षित असल्याचे या तिघांनी सांगितले होते, यावेळी या तिघांनी त्याला आणखीन काही उमेदवार मिळवून दिल्यास त्याला कमिशन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तक्रारदारासह इतर पाचजणांनी त्यांना नोकरीसाठी सुमारे ३४ लाख रुपये दिले होते.
काही दिवसांनी त्यांना मेडीकलसाठी कोलकाता येथे बोलाविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. या प्रशिक्षण केंद्रात राजस्थान, बिहार, दिल्ली आणि महाराष्ट्रातून पंधराहून तरुण आले होते. या सर्वांना दररोज प्रशिक्षण दिले जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र त्यांचे प्रशिक्षण आठवड्यातून एक दिवस चालत होते. याच दरम्यान त्याची ओळख नाशिकच्या दोन तरुणासोबत झाली होती. सर्व काही सुरळीत सुरु असताना एक दिवस तिथे एक महिला आली आणि तिने रुम बाहेरुन बंद केला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी खिडकीतून पलायन केले. यावेळी त्यांना तिथे पोलिसांचा छापा पडल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी मोहम्मद दानिशला ही माहिती सांगितली. यावेळी त्याने साहेबांना पैसे मिळाले नाही म्हणून ही कारवाई झाल्याचे सांगून विषय टाळण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी त्याला खोपोली रेल्वे स्थानकात शिपाई पदावरील नियुक्तीपत्र दिले होते. त्याच्यासह इतरांना अशाच प्रकारे नियुक्तीपत्र पाठविण्यात आले होते. मात्र त्याची शहानिशा केल्यानंतर ते नियुक्तीपत्र बोगस असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार उघडकीस येताच त्याचे मोहम्मद दानिशसोबत भांडण झाले होते. त्यामुळे त्याने त्याच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने पैसे देण्यास नकार देत त्याची मुख्यमंत्र्यासह रेल्वे मंत्र्याशी ओळख आहे. तुम्ही आमचे काहीही करु शकत नाही अशी धमकी दिली.
याच दरम्यान तक्रारदार वकिलाला या टोळीकडून फसवणुक झालेले अनेक तरुण भेटले होते. त्याच्यासह इतर पाचजणांनी त्यांनी सुमारे ३४ लाख रुपये घेतले होते. मात्र कोणालाही रेल्वे नोकरी मिळवून दिली. त्यामुळे त्याने सांताक्रुज पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मोहम्मद दानिश, राहुल सिंग आणि कैलास सिंग या तिघांविरुद्ध पोलिसांनी रेल्वेचे बोगस दस्तावेज बनवून नोकरीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन पाचजणांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे आदेश सांताक्रुज पोलिसांना दिले होते. आरोपींचा शोध सुरु असतानाच दोन दिवसांपूर्वी या कटातील मुख्य आरोपी कैलास सिंग याला पोलिसांनी अटक केली. तपासात कैलास हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच नऊ गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याचे इतर दोन सहकारी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.