रेल्वेत विविध पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणुक
मध्य रेल्वेच्या मुख्य साहित्य डेपो अधिक्षकाला सीबीआयकडून अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ मार्च २०२४
मुंबई, – मध्य रेल्वेत विविध पदासाठी नोकरी भरती सुरु असल्याची बतावणी करुन फसवणुक करणार्या मध्य रेल्वेच्या मुख्य साहित्य डेपो अधिक्षकाला सीबीआयच्या अधिकार्यांनी अटक केली. राजेश पी नाईक असे या अधिकार्याचे नाव असून तो मध्य रेल्वेच्या परळ वर्कशॉपमध्ये कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या घरासह तीन ठिकाणी सीबीआयने छापेमारी करुन मोठ्या प्रमाणात बोगस दस्तावेजाचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला सीबीआय कोठडी सुनावली आहे.
राजेश नाईक हा मध्य रेल्वेच्या परळ वर्कशॉपमध्ये मुख्य साहित्य डेपो अधिक्षक म्हणून कार्यरत होता. गेल्या काही महिन्यांत त्याने अनेकांना भारतीय रेल्वेत विविध पदासाठी नोकरी भरती सुरु आहे असे सांगून नोकरीचे आमिष दाखविले होते. यातील तक्रारदारांनी त्याची भेट घेऊन त्याच्या दोन्ही मुलांच्या नोकरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने त्यांना त्यांच्या दोन्ही मुलांना ज्युनिअर क्लार्क पदावर नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामोबदल्यात त्याने राजेशला १० लाख ५७ हजार रुपये दिले होते. ही रक्कम सुरक्षा ठेव, वैद्यकीय तपासणी, प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम शुल्क म्हणून घेण्यात आली होती. काही दिवसांनी त्याने त्यांना डीपीओ यांच्या नावाने नियुक्तीपत्रासह वैद्यकीय तपासणी आणि प्रशिक्षणाचे बोगस पत्रे दिले होते. मात्र त्याची शहानिशा केल्यानंतर त्यांना ते सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे उघडकीस आले होते.
रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून आरोपी अधिकारी अनेकांची फसवणुक करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सीबीआयकडे तक्रार केली होती. या तक्रारीची सीबीआयकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात तथ्य असल्याचे आढळून येताच या अधिकार्यांनी राजेश नाईकला फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर त्याच्या घरासह तीन ठिकाणी या अधिकार्यांनी छापेमारी केली होती. या कारवाईत या अधिकार्यांनी मोठ्या प्रमाणात बोगस ऑफर लेटर, ट्रेनिंग ऑर्डर, बँक ट्रान्झेक्शन स्लिप आदी बोगस दस्तावेज सापडले. प्राथमिक तपासात त्याने तक्रारदारासह वीसहून अधिक बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकाळल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे.