अमृतसर एक्सप्रेसमध्ये स्फोटके असल्याच्या कॉलने खळबळ
संपूर्ण एक्सप्रेसची तपासणी केल्यानंतर अफवा असल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ डिसेंबर २०२४
मुंबई, – अमृतसर एक्सप्रेसमध्ये स्फोटके असल्याच्या निनावी कॉलने मंगळवारी एकच खळबळ उडाली होती. या कॉलनंतर संपूर्ण एक्सप्रेसची तपासणी केल्यानंतर ती अफवा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी रफिक शेख नाव सांगणार्या कॉलरविरुद्ध स्फोटके असल्याची खोटी माहिती सांगून तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएमकडून शोध सुरु आहे.
मुंबई पोलिसांच्या रेल्वेच्या मुख्य कंट्रोल रुमला मंगळवारी पावणेअकरा वाजता एका व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने स्वतचे नाव रफिक शेख सांगून अमृतसर एक्सप्रेस गाडी क्रमांक ११०५८ मधील लगेज डब्ब्यात पांढर्या रंगाच्या दोन गोण्या आहेत. त्यावरतिरुपती टॉईज असे लिहिले असून गोण्यामध्ये स्फोटके असल्याची माहिती सांगितली होती. त्यानंतर त्याने कॉल बंद केला होता. या कॉलनंतर पोलिसांनी पुन्हा संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. ही माहिती नंतर वरिष्ठांना देण्यात आली होती. वरिष्ठांच्या आदेशानंतर डोंगरी पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती. संपूर्ण अमृतसर एक्सप्रेसची तपासणी केल्यानंतर लगेज डब्ब्यात काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे स्फोटके असल्याचा तो कॉल बोगस असल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर कॉल करणार्या रफिक शेख याच्याविरुद्ध डोंगरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ज्या मोबाईल क्रमांकावरुन हा कॉल आला होता, त्या क्रमांकाची माहिती काढण्याचे काम सुरु असून लवकरच कॉल करणार्या व्यक्तीला अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.