रेल्वेच्या टेंडरसाठी गुंतवणुक म्हणून घेतलेल्या २.८२ कोटीचा अपहार
पुण्याच्या पती-पत्नीसह तीन ठगांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ जून २०२४
मुंबई, – रेल्वेच्या टेंडरसाठी गुंतवणुक म्हणून घेतलेल्या २ कोटी ८२ लाख रुपयांचा अपहार करुन एका व्यापार्यासह त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांची फसवणुक झाल्याचा प्रकार फोटो परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका पती-पत्नीसह तीन ठगाविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आमीर मेहबू शेख, सिमरण आमीर शेख आणि भूषण वालवन अशी या तिघांची नावे असून ते तिघेही मूळचे पुण्याचे रहिवाशी आहेत. या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
साजिद अब्दुल रज्जाक शेख हे कुर्ला येथील किरोल व्हिलेज, कोहीनूर फेज परिसरात राहत असून त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. सप्टेंबर २०२२ रोजी त्यांची आरोपीसोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते चांगले मित्र झाले होते. याच दरम्यान आमीर आणि सिमरन यांनी त्यांना रेल्वेचे एक टेंडर निघणार आहे. ते टेंडर त्यांना मिळवून देतो, त्यातून त्यांना चांगला फायदा होणार आहे. या टेंडरसाठी त्यांनी गुंतवणुक केल्यास त्यांना पंधरा ते वीस टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून साजिद शेख यांच्यासह त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांनी त्याला २ कोटी ८२ लाख रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना रेल्वेचे टेंडर मिळवून दिले नाही किंवा गुंतवणुकीसाठी दिलेले पैसे परताव्यासह परत केले नाही. पैशांची मागणी केल्यानंतर ते तिघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. फसवणुकीचा हा प्रकार साजिद शेख यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयात तिन्ही आरोपीविरुद्ध कारवाई करण्याची विनंती अर्ज केला होता. या अर्जाची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर साजिद यांची पोलिसांनी जबानी नोंदवून आमीर शेख, त्याची पत्नी सिमरण शेख आणि मित्र भॅषण वालवन यांच्याविरुद्ध ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपींच्या अटकेसाठी लवकरच एक टिम पुण्याला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.